पंजाब-हरयाणातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर

अमृतसर : वृत्तसंस्था । केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरयाणातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी सकाळी दिल्ली-हरयाणा सीमेवर अंबालाजवळ जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे आणि अश्रुधुरांचा वापर केला.

दुसरीकडे पोलिसांना विरोध करताना आंदोलकांनी बॅरिकेड्सवर दगडफेक केली. ते उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला असून विविध गटांद्वारे शेतकरी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यांवर पाण्याचा फवारे मारणाऱ्या दिल्ली पोलिसांवर सगळीकडून टीका केली जात आहे. दिल्लीतील सध्याच्या कडाक्याच्या थंडीत पोलील आंदोलकांवर पाण्याचे फवारे कसे काय मारु शकतात असे प्रश्न विचारले जात आहेत. गुरुवारी सकाळी हरयाणा-दिल्ली सीमेवरील अंबाला येथे याचीच पोलिसांनी पुनरावृत्ती केली.

पोलिसांच्या कारवाईवर भाष्य करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “शेतकरी केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. हे कायदे मागे घेण्याऐवजी शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखलं जात आहे. त्यांच्यावर पाण्याच्या तीव्र फवाऱ्यांचा वापर केला जात आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करणं योग्य नाही. शांततेत आंदोलन करणं हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे.”

शेतकऱ्यांना येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली-हरयाणा सीमेवर गुरुवारी सकाळी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. दिल्ली चलो मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेऊन हरयाणा सरकारने आपल्या राज्याच्या सीमा पूर्णपणे सील केल्या आहेत. दिल्लीत सध्या कोरोनाचा कहर सुरु असल्याने आंदोलकांना दिल्लीत एकत्र येता येणार नाही असं सांगत पोलिसांनी त्यांना परवागनी नाकारली होती.

Protected Content