नाशिकमध्ये शिवसेना , भाजपची वर्चस्वाची लढाई पुन्हा रंगणार

नाशिक : वृत्तसंस्था । भाजप आणि शिवसेनेमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी कलगीतुरा रंगला आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्यानंतर, खवळलेल्या शिवसेनेने आता भाजपला धोबीपछाड देण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे.

भाजपचे बडे नेते सुनील बागुल आणि वसंत गीते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राऊत यांच्या आजच्या नाशिक दौऱ्यानंतर नाशिकमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

सत्ताबदल झाल्यानंतर भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या वसंत गीते आणि सुनील बागुल या दोन बड्या नेत्यांना गळाला लावण्यात शिवसेना यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेल्या बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात पुन्हा प्रवेश केला होता. ही संपूर्ण बाब जिव्हारी लागलेल्या शिवसेनेने भाजपा फोडायला सुरुवात केली आहे.

मागच्या आठवड्यात भाजपच्या काही उद्योग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल आणि वसंत गीते हे दोन प्रदेश पातळीवरचे नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची खात्रीलायक माहिती आहे. याबाबत शिवसेना अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सूचक विधान करत राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली आहे.

नाशिकमध्ये झालेल्या एका मिसळ पार्टीमुळे या चर्चांना आणखीच उधाण आला आहे. वसंत गीते यांनी आयोजित केलेल्या या मिसळ पार्टीमध्ये शिवसेनेच्या जवळपास सर्वच नेत्यांनी हजेरी लावली होती. यानंतर गीते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले सुनील बागुल देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान या दोन्ही नेत्यांची जबाबदारी आणि त्यांना देण्यात येणारी कमिटमेंट याबाबत चर्चा होईल अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी कधीकाळी अत्यंत जवळीक असलेले आणि नाशिकला मनसेचा बालेकिल्ला बनवण्यात सिंहाचा वाटा असणारे वसंत गीते पुन्हा मनसेत यावेत यासाठीदेखील मनसेकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र एकूणच शहरातली राजकीय परिस्थिती पाहता गीते शिवसेनेत जातील हे जवळपास निश्चित झालं आहे.

शहरातले मास लीडर आणि कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आणि क्रेझ असलेले नेते म्हणून वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्याकडे बघितलं जातं.

भाजपमध्ये जरी या दोन्ही नेत्यांना कोपऱ्यात बसवण्याचा प्रयत्न झाला असला तरी शिवसेनेत प्रवेश झाल्यास येणाऱ्या महापालिकेत भाजपची डोकेदुखी निश्चित वाढू शकते

दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची आणि या दोन्ही नेत्यांची गुप्त भेट होण्याची शक्यता असून, या भेटीमध्येच दोन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब होऊ शकते. असं झाल्यास येत्या दिवसात प्रचंड मोठं शक्तिप्रदर्शन करत हे दोन्ही नेते शिवसेनेत प्रवेश करून भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. जर हे घडलं तर शिवसेना आणि भाजप यांच्यात पडलेल्या वादाच्या ठिणगीचं रुपांतर मोठ्या वणव्यात होऊ शकतं.

Protected Content