नवाब मलिकांचा आरोप हवेतला गोळीबार नव्हता ! : संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी | एनसीबी करत असलेली कारवाई संशयास्पद असल्याचा नवाब मलीक करत असलेला आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता हे या प्रकरणातील ताज्या गौप्यस्फोटानंतर समोर आल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

आज एनसीबीच्या एका पंचाचाच व्हिडीओ समोर आला आहे. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जेलमधून बाहेर सोडण्यासाठी शाहरुखकडून २५ कोटी मागण्यात आले होते. त्यातील ८ कोटी समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा खळबळजनक दावा व्हिडीओत करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडले.

राऊत म्हणाले की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी काही पुरावे समोर आणले आहेत. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता. कालपासून एनसीबीच्या अधिकार्‍यांच्या कारवाईचे काही पुरावे समोर येत आहेत. जे पुरावे किंवा पंच म्हणून पुढे आले ते कोण होते? किती संशयास्पद चारित्र्याचे हे लोकं होते, त्याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण कशी झाली याचे पुरावे आता समोर आले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितलंय की, अंमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही लोकांनी सुपारी घेतली आहे. ते आता सिद्ध झालं आहे. एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणा या कुणाच्या दबावाखाली मुंबईत काम करतात. राज्याला बदनाम करतात, हे देशाला कळलं पाहिजे. मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ते मुंबईचं वैभव आहे. त्या फिल्म इंडस्ट्रितसुद्धा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सुद्धा सिनेसृष्टी बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरुन सिनेसृष्टी महाराष्ट्रातून निघून जावं, अशाप्रकारचे प्रयत्न काही लोकं करत आहेत, असं राऊत म्हणाले.

Protected Content