नरेंद्र मोदी डरपोक : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्याही मंचावर माझ्यासोबत 10 मिनिटं चर्चा करावी. पण ते घाबरतात. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट जाणवू लागली आहे. ते अतिशय भित्रे आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. दिल्लीत पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीला राहुल यांनी संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, देशातल्या प्रत्येक सरकारी संस्थेत संघाचा एक तरी माणूस असला पाहिजे हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आमची सत्ता आल्यावर आम्ही संघाशी संबंधित माणसाला हाकलून देऊ असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारकडून फक्त द्वेष पसरवला आहे. द्वेषाचे राजकारण करून देश जिंकता येत नाही त्यामुळे या सरकारचा पराभव झालाच पाहिजे अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. देशाचा मूलभूत पायाच पोखरण्याचं काम या सरकारने केलं आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. याचसाठी राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचेही उदाहरण दिले. चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करू दिले जात नाही असाही आरोप केला होता. लोकशाहीसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब ठरली होती. त्यावेळी त्यांनी जस्टिस लोया यांचेही नाव घेतले होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे कामात आडकाठी करत आहेत असाच आरोप त्या न्यायाधीशांनी अमित शाह यांचे नाव न घेता केला होता असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

Add Comment

Protected Content