मी सांगतोय…जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार : राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले. ठाकरे सरकारकडे हा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली.

 

राज्य सरकारने अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक राज्यात आंदोलन करत आहेत. जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे बोलणे झाले. त्यांचेही म्हणणे आहे की जिम सुरु झाले पाहिजे. आता मी सांगतोय, ओपन करा, जिम सुरु करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय. किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या, असे आवाहन राज यांनी केले. दरम्यान, जिम व्यावसायिक, जिम ट्रेनर, बॉडीबिल्डर आणि सर्वसामान्य व्यायामप्रेमी नागरिकांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’बाहेर सकाळपासूनच गर्दी केली होती.

Protected Content