शरद पवारांनी घेतली कोरोनाची लस

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे.

 

 

आज दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली. आजपासून देशात  लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून त्याअंतर्गत ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीमध्ये लसीचा पहिला डोस घेतला. मोदींप्रमाणेच शरद पवार यांनीही सोशल नेटवर्किंगवरुन या लसीकरणासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली.

 

“आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो,” असं पवार यांनी लस घेतानाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.

 

 

 

“एम्स रुग्णालयात पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला कोरोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

 

६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येणार आहे. तसेच  ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाईल. पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी कमाल अडीचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

* पात्र नागरिकांनी ‘कोविन डिजिटल’ मंचावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आगाऊ नोंदणी करता येऊ शकेल किंवा लसीकरण केंद्रातही लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल.

 

* नोंदणी करताना नागरिकांनी आपली जन्मतारीख व इतर तपशील काळजीपूर्वक नमूद करावा. हा तपशील आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा निर्धारित केलेल्या शासकीय कागदपत्रातील तपशिलानुसार असणे आवश्यक आहे.

Protected Content