मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओबीसी आरक्षणाला वेळ मिळावा यासह पावसाळ्यातील गैरसोय टाळण्यासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या ९२ नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात त्यांनी आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली.
काही दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या असून सर्व पक्षांनी या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वीत सोमवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाची शिष्टमंडळ भेट घेईल. असे सांगितले होते. यानुसार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, ऐन पावसाळ्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबरनंतर घ्याव्या, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यात पावसाळा निघून जाईल. आणि यासोबत ओबीसी आरक्षणाला पुरेसा वेळ मिळेल असेही ते म्हणाले.