नगरदेवळा येथील सेंट्रल बॅंकेच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक त्रस्त!

पाचोरा, प्रतिनिधी| तालुक्यातील नगरदेवळा येथील सेंट्रल बॅंकेतील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना सेवा सुविधा न देता अरेरावीची भाषा करण्यात येत आहे. यामुळे कामकाज सुरळीत सुरू न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिले आहेत.

देशातील शेवटच्या नागरिकांना सुद्धा बँकींगचा लाभ घेता यावा यासाठी १९ जुलै १९६९ रोजी केंद्र सरकारने देशातील बहुतेक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्या अनुषंगाने तालुक्यातील नगरदेवळा शाखा स्थापन करण्यात आली. हि बॅंक परीसरातून एकमेव जुनी बॅंक आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून बॅंकेतील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट वागणुक दिली जात आहे. तसेच अरेरावीची भाषा देखील करण्यात येते. व सोई सुविधा देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे ग्राहक हतबल झाले आहेत. दरम्यान कारभार सुरळीत सुरू असायला हवा यासाठी बँकेला टाळे ठोकणार असल्याचे निवेदन महिलांनी दिलेले आहे. तरीही यावर कुठल्याही प्रकारचे परिणाम झाले नाही. म्हणून कामकाज सुरळीत सुरू न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिले आहेत. तत्पूर्वी बँकेतील प्रिंटर मशीन गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे खात्यात किती रक्कम आहे. हे बघता येत नाही. तसेच रक्कम काढतांना अडचण येते. अकाऊंट चे आयकर करीता लागणारे मिनी स्टेटमेंट द्यायला कर्मचारी तयार नाहीत. यामुळे ग्राहकांना खाजगी ठिकाणी पैसे देऊन प्रिंट काढावी लागते. त्याचबरोबर पैसे काढण्यासाठी स्लिप लागते. मात्र ती पद्धतच याठिकाणी बंद आहे. त्यामुळे तासन तास रांगेत ग्राहकांना उभे राहावे लागते. यात जेष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रामुख्याने याठिकाणी जेष्ठ नागरिकांना पैसे टाकणे किवा काढण्यासाठी स्वतंत्र खिडकी नाही. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. कर्जाच्या फाईली अशाच धूळ खात पडून राहतात. त्याकडे लवकर बघितले जात नाही. व एटीएम मध्ये नेहमी पैसे नसतात यामुळे बंदच पडून असते. याबाबत बॅंक मॅनेजर धनंजय रोकडे यांना वेळोवेळी निवेदने देऊन बॅंकेला टाळे ठोकण्याचा इशारा महिलांनी दिले आहेत. मात्र त्यांच्याकडून डोळेझाक होत आहे. निवेदनावर अंजली चौहान, भाग्यश्री पाटील, हेमलता महाजन, सरिता निकम, माधुरी महाजन, सविता पवार, अनिता परदेशी, प्रतिभा पाटील, पूनम पाटील, कृष्णा मनियार, यश चव्हाण यांच्या सह्या आहेत.

Protected Content