घोषणाबाजी नको, शेतकर्‍यांकडे लक्ष द्या : खा. रक्षा खडसेंची राज्य सरकारवर टीका

जळगाव, प्रतिनिधी | राज्य सरकार केवळ घोषणाबाजी आणि भाषणबाजी करत असून शेतकर्‍यांकडे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप करत खासदार रक्षा खडसे यांनी सरकारवर आज जोरदार टीका केली आहे.

सोमवारीच जिल्हा भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला होता. याप्रसंगी सर्व नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. यानंतर आज पुन्हा खासदार रक्षा खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यात जवळपास सर्वच भागात चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्‍यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमिनीचंही नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांवर मोठं संकट कोसळलंय. या मुद्द्यावरुन खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

या संदर्भात आज खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, फक्त घोषणा करुन आणि भाषणं करुन शेतकर्‍यांचे प्रश्न सुटत नाहीत. ठाकरे सरकारकडून दिवाळीनिमित्त शेतकर्‍यांना आणि जनतेला खूप मोठी अपेक्षा होती. मात्र, खूप कमी मदत शेतकर्‍यांना देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे मला फोन येत आहेत. सरकारनं शेतकर्‍यांकडे पूर्ण दूर्लक्ष केल्याचा आरोप रक्षा खडसे यांनी केलाय. मी सरकारला याबाबत पत्र लिहिणार आहे असं सांगतानाच शेतकर्‍यांकडे लक्षं द्या, अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.

Protected Content