मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीच्या काळात तत्कालीन फडणवीस सरकारने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक उघड झाली आहे. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारचे काही अधिकारी इस्रायलला गेले होते. त्यांनी तिथून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे फोनवरचे संभाषण ऐकल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. कोरेगाव-भीमा प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे. आमच्याकडे अशाप्रकारची अनेक निवेदने आली आहेत. भाजप विरोधात कुणीही विचार मांडले तर त्याला अर्बन नक्सल म्हणायचे, अशी फडणवीस सरकारची भूमिका होती. त्यामुळे या सगळ्याची योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही देशमुख यांनी सांगितले आहे.