विद्यार्थी व शास्त्रज्ञांनी पेटंटबाबत सतर्क राहून जनजागृती करावी – निलेश पाटील

Bhusawal news 6

भुसावळ प्रतिनिधी । भारतीय विद्यार्थ्यांची व उद्योजकांची बुद्धीमत्ता व कार्य करण्याच्या क्षमतेनुसार भारतात सर्वाधिक पेटंट असायला हवेत. परंतू जागरूकतेच्या अभावामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी वस्तूंचे पेटंट झाले आहेत. भारतीयांनी संशोधन करतानाच बौद्धिक संपदा, पेटंट किंवा कॉपी राईट याबाबत सजग होणे गरजेचे आहे,” असे प्रतिपाद केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स विभागात पेटंट एक्सामीनर म्हणून कार्यरत असलेले निलेश पाटील यांनी केले.

भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागातर्फे ‘नविन शोध, बौद्धिक संपदा व पेटंट’ विषयावर आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करतांना केले. टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इंप्रोव्हमेंट प्रोग्राम अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठच्या माध्यमातून दिनांक २२ जानेवारी २०२० ते २३ जानेवारी २०२० दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, विभाग प्रमुख डॉ.गिरीष कुळकर्णी, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७५ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यशाळा प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा. दीपक खडसे, प्रा. निलेश निर्मल, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.दीपक साकळे, प्रा.धिरज पाटील यांनी परिश्रम घेतले.

पेटंटमुळे नवीन उद्योग व रोजगार निर्मिती
काही वेळेस जे मूळचे आपले आहे, अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे पेटंट बाहेरच्या देशातील कंपन्या घेऊ शकतात. त्यामुळे भारतीयांनी अधिकाधिक गोष्टींचे पेटंट मिळवायला हवे. तरुण विद्यार्थी व शास्त्रज्ञांनी पेटंटबाबत सतर्क राहून जनजागृती करावी. एक पेटंट म्हणजे एक ‘इंडस्ट्री’च असते. पेटंट मिळाल्यावर नवीन उद्योगाचा जन्म व शेकडो लोकांना स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळतो. लाखो रुपयाचे उत्पन्न निर्माण होते. तसेच पेटंट झालेल्या वस्तूचा समाजालाही फायदा होतो असे पाटील यांनी पहिल्या सत्रात सांगितले.

पेटंट मिळवणे अतिशय महत्त्वाचे
दुसऱ्या सत्रात निलेश पाटील यांनी, भारतीय पेटंटचे महत्त्व, भारतातील पेटंट फाइल्सची वर्तमान स्थिती, पेटंट हक्काचे आर्थिक महत्त्व, भारतीय पेटंट संरक्षणाची जागतिक परिस्थिती, भौगोलिक निर्दर्शन अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. महाविद्यालये व विद्यापीठात अनेक संशोधने होत असतात; तसेच अभियंते-शास्त्रज्ञ प्रयोग करून नवीन निर्मिती करतात. या बौद्धिक संपदेचा मूळ संशोधकाला लाभ व्हावा म्हणून पेटंट मिळवणे अतिशय महत्त्वाचे ठरते असे पाटील यांनी सांगितले.

नवीन तंत्रज्ञान समाजाच्या फायद्यासाठी – डॉ. सिंह
पेटंटच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान निर्माण होऊन उद्योग जगतात वापर होतो व व्यावहारिकदृष्ट्याही फलदायी ठरते. एखादा शोध समाजाच्या फायद्यासाठी, माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी असेल, तर तो व्यावहारिकदृष्ट्याही फलदायी ठरतो. याचाच अर्थ आपण जो नवा शोध लावणार आहोत, तो उद्योग जगताबरोबरच समाज व्यवस्थेशी सुसंगत आहे ना, याचेही भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह यांनी मांडले. पेटंट हे शिक्षण व्यवस्थेचे एक अंग होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची प्रश्न विचारण्याची आणि त्यातून निर्माण झालेल्या कुतुहलातून नवे शोध लावण्याची क्षमता विकसित व्हावी, हे महाविद्यालयीन शिक्षण समितीचे उद्दिष्ट आहे. पेटंट व्यवस्था आणि शिक्षण क्षेत्राच्या एकात्मिकरणातून ते महाविद्यालयात साध्य करू शकता येईल असेही प्राचार्य डॉ. सिंह म्हणाले.

Protected Content