धक्कादायक : आसोद्यात हॉटेलसमोर हवेत गोळीबार; दोन जण ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ आर्या हॉटेलजवळ मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास बंदुकीने तीन फायरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणात जळगाव तालुका पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. अटकेतील एक संशयित हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळील हॉटेल आर्याजवळ मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीवर दोन जण दारूच्या नशेत आले. हातात बंदूक घेऊन हवेत तीन फायरिंग करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली. नेमकी फायरिंग कोणत्या कारणासाठी केली याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी कसुन चौकशी केल्यानंतर तीन राऊंड आढळून आले. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या दोन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यातील एक संशयित हा अटल गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. दोघांची कसून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Protected Content