


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या आंदोलनादरम्यान बोदवड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी आणि संघर्ष समितीचे राज्य नेते राजू थाटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरवादी जन संघटना व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दाखल गुन्ह्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीतर्फे राज्यभर आंदोलने आणि मोर्चे आयोजित करण्यात येत आहेत. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे अनुसूचित जाती समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. या सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदास आठवले गट)चे जळगाव जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी तसेच संघर्ष समितीचे राज्य नेते राजू थाटे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणांवर काही नागरिकांनी आक्षेप घेत बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हा गुन्हा खोटा व दिशाभूल करणारा असून सामाजिक व राजकीय आंदोलनात सक्रिय असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर भूमिका मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने दिला आहे. लोकशाही व्यवस्थेत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान असून, आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणांविरोधात आवाज उठविणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. बोदवड येथील घटनेचा निषेध करत आंबेडकरवादी जन संघटना व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी आणि निदर्शने केली. संबंधित प्रकरणाची वस्तुनिष्ठ पद्धतीने चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बोदवड येथील घटनेची आपल्या स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत निष्पक्षपणे तपास करण्यात यावा, अशी आग्रहाची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर आंबेडकरवादी जन संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने मुकुंद सपकाळे, विनोद सोनवणे, प्रा. प्रितीलाल पवार, जितेंद्र केदार, चंद्रकला सुरवाडे, संजय बागुल, यशवंत बैसाणे, लखन पानपाटील, अजय शेलार, सतीश गायकवाड आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



