दोन दिवसांचे होणार पावसाळी अधिवेशन

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे यंदाचे राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै असे दोन दिवसांचे होणार असल्याचा निर्णय आज घेण्यात आला असून यावर भाजपने जोरदार टीका केली आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने विरोधकांकडून मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र अधिवेशन घेण्याची तसेच १५ दिवसांचं विधिमंडळांचं अधिवेशन घेण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केली आहे. एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन होऊ शकतं. दुसरीकडे बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालत. पण, राज्याच्या विधिमंडळामध्ये करोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचं नाही, ही सरकारची मानसिकता आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव सरकारचा आहे. त्यामुळे कामकाज समितीतून आम्ही बाहेर पडलो असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.

Protected Content