दिल्ली रेल्वे स्थानकासाठी अदानींचीही निविदा

नवी दिल्ली । देशातील सहा विमानतळांचा कारभार हाती घेतल्यानंतर अदानी समूहाने आता नवी दिल्ली रेल्वे स्थानकासाठी निविदा दाखल केली आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याच्या उद्देशाने नवीन योजना आखण्यात आली आहे. रेल्वे विकास प्राधिकरणाने यासंदर्भात ऑनलाइन निविदा मागवल्या होत्या. या कामासाठी देशविदेशातील २० कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. यामध्ये देशातील सहा विमानतळांची देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट मिळविणा़र्‍या अदानी समूहाबरोबरच जीएमआर, जकेबी इन्फ्रास्ट्रक्चर, अरेबियन कन्स्ट्रक्शन यांसारख्या मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्प हा रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत रेल्वे स्थानक परिसरात कमर्शियल, रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी हब उभारण्यात येणार आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावर एखाद्या विमानतळाप्रमाणे सेवा पुरवल्या जाणार आहेत. तर हॉटेल, दुकाने आणि इतर अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

हा प्रकल्प डिझाईन बिल्ड फायनान्स ऑपरेट ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्त्वावर ६० वर्षांच्या कन्सेशन कालावधी तत्त्वावर उभारला जाणार आहे. चार वर्षांमध्ये हे पुनर्विकास आणि पुनर्बांधणीचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल. यामध्ये रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, इतर आजूबाजूच्या सोयीसुविधांचा पुनर्विकास, सार्वजनिक सेवांची पुनर्बांधणी, रेल्वे कार्यालय आणि रेल्वे क्वॉर्टर्सचे आधुनिकीकरण अशा टप्प्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

Protected Content