सावदा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील चिनावल येथील कुंभारखेडा रस्त्यावरील वस्तीत किरकोळ देशी दारू विक्रीचे तसेच विदेशी दारू दुकानासाठी ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र देवू नये अशी मागणी जवळपास २०० महिलांनी सरपंच यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, कुंभारखेडा रस्ता चिनावल ता.रावेर जि.जळगाव कायम कुटुंब करून रहाणारे रहिवासी असून या परिसरात आमच्या रहात्या घराच्या १०० फुट अंतराच्या आत गट नंबर ८८८ प्लॉट नंबर ११ व १२ ह्या जागेवर चंद्रकांत डोंगर भंगाळे यांनी सदर दुकान सुरु करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी सरपंच यांना केली आहे. दि. ३१/०१/२०२२ रोजी ग्रामसभेत झालेल्या चर्चेवरून समजले. या दुकानामुळे आम्हास त्रास होवू शकतो तसेच कुटुंबावर तसेच लहान मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होवू शकतो तसेच सदर जागेच्या बाजूला महिलांचे शौचालय असून महिलांचा जाणे येणेचा रस्ता हा सदर जागेच्या समोरूनच असल्याने ते महिलांना त्रासाचे तसेच अडचणीचे ठरू शकते. परिणामी यामधून वाद उद्भवू शकतो तसेच सदर जागेच्या परिसरात शाळा मंदिर तसेच मुस्लीम स्मशानभूमी (कब्रस्थान ) असून सदर परिसराचे पावित्र्य पहाता या व्यक्तीस नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यास आमची तीव्र हरकत आहे. तरी सर्व परिस्थीचा व उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करून सदर जागेत सुरु होणारे किरकोळ देशी दारू विक्रीचे तसेच विदेशी दारू दुकान सुरु करण्यास नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येवू नये. निवेदनावर भावना पाटील, कल्पना भिरूड, प्रियांका भिरूड, विमलबाई अंगाडे, सविता भंगाळे, मनीषा पाटील, ललिता कंडारे, मंगला नेमाडे, लक्ष्मी कंडारे, सोनाबाई कंडारे, पद्माबाई कंडारे, छायाबाई कंडारे, कमलाबाई काळे, ज्योती कंडारे, विजया पाटील, अनिताबाई कंडारे, शिवानी कंडारे, एकता कंडारे अशा जवळपास २०० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले आहे.