भुसावळ प्रतिनिधी । रोजच्या व्यवहारात आपण अनेक वस्तू वापरतो. परंतु काम झाल्यावर त्या टाकून देतो. त्यामुळे त्यांचा अपमान होतो. वस्तू आपले जगणे सुखकर करत असतात. म्हणून त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे. अशा प्रकारच्या निरीक्षण, वाचन, चिंतनातून व रोजच्या पाहण्यातून वस्तू ही कविता लिहिली. तीव्र संवेदनशीलतेतून वस्तूंविषयीची कृतज्ञता जाणवली असल्याचे प्रतिपादन दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील “वस्तू” या कवितेचे कवी दत्तात्रय भास्कर धामणस्कर यांनी केले.
जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन संवाद सत्राच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या सत्रात ते बोलत होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. कवी धामणस्कर यांचा परिचय अनिता पाटील यांनी करून दिला. अधिकचा परिचय धामणस्कर यांचे चिरंजीव अजित धामणस्कर यांनी दिला. भुसावळ गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून शिक्षक व विद्यार्थ्यांना याचा निश्चितच लाभ होईल असे सांगितले. त्यानंतर कवी द. भा. धामणस्कर आपल्या मनोगतात म्हणाले की, वस्तू आपल्याला सेवा देतात. त्यामुळे त्यांना बेपर्वाईने न वापरता त्यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगावी. त्यांचे उपकार स्मरावे. त्यांचा आदर करावा. वस्तूंना सातत्याने कार्यक्षम ठेवल्यास, कृतज्ञता व्यक्त केल्यास आपण एक प्रकारे वस्तूंमध्ये प्राण आणलेला असतो. त्यामुळे वस्तू सन्मानाने वागवाव्या, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी आपल्या वाणीतून ‘वस्तू” ही कविता सादर केली. ९१ वर्ष वय असतानासुद्धा कवितेविषयी ते भरभरून बोलले आणि वस्तू ही कविता सादर केली. कविता सादरीकणाचा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मीनल भोळे मुंबई, दिलीप वैद्य रावेर, मधुसूदन वटक अमरावती, विदूला तेंडूलकर पालघर, भागवत घेवारे उस्मानाबाद यांनी मनोगत व्यक्त केले.