रेल्वेतून पडलेल्या तरुणाला वाचवणाऱ्या कर्मचार्‍यांचे कौतुक

8b60b283 66f3 4255 be0f 738c6de45a10

भुसावळ, प्रतिनिधी | जिल्ह्यातील महिजी रेल्वे स्थानकानजीक गर्दीमुळे रेल्वेतून खाली पडून जखमी झालेल्या तरुणाला रेल्वे उलट्या दिशेने नेवून वाचवणाऱ्या कर्मचार्‍यांचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी आज (दि.७) रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून कौतुक केले आहे.

 

अधिक माहिती अशी की, देवळाली-भुसावळ पॅसेंजरमधून प्रवास करीत असलेला राहुल संजय पाटील (वय २२) हा पाचोरा येथील विद्यार्थी जखमी झाला होता. ही घटना माहिजीजवळील रेल्वे खांब क्रमांक ३८३ जवळ गुरुवारी सकाळी ९.३०च्या सुमारास घडली होती. जखमी विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचार्‍यांनी तब्बल दोन किलोमीटर गाडी मागे नेवून त्याला म्हसावद रेल्वे स्थानकावर आणले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेत जखमी प्रवाशासाठी देवदूतासमान ठरलेल्या देवळाली शटलमधील लोकोपायलट, सहाय्यक लोकोपायलट तसेच गार्ड यांचा शुक्रवारी डीआरएम गुप्ता यांनी एक हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करीत त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.

गर्दीमुळे पडल्याने विद्यार्थी जखमी
जळगावच्या आयएमआर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेला राहुल पाटील हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी देवळाली शटलने जळगावकडे निघाल्यानंतर माहिजी रेल्वे स्थानकाजवळ गर्दीमुळे रेल्वेतून पडला होता. या घटनेनंतर गाडीतील प्रवाशांनी धोक्याची साखळी ओढून गाडी थांबवली होती. या घटनेबाबत ‘ट्रेन लाईव्ह’ संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना घटनेची माहिती कळवल्यानंतर त्यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक एस.टी.जाधव यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली हेाती. जाधव यांनी परधाडे व माहिजी स्टेशन प्रबंधकांसह गाडीतील लोकोपायलट यांच्याशी संपर्क साधला व रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची परवानगी मिळाल्यानंतर तब्बल दोन किलोमीटर जखमी प्रवाशासाठी देवळाली पॅसेंजर मागे घेण्यात आली होती. जखमी प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी चालकासह गार्डने दाखवलेल्या माणुसकीचे रेल्वेच्या प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांनीही कौतुक केले होते. जखमी विद्यार्थ्यासाठी देवदूतासमान ठरलेल्या शटलमधील कर्मचाऱ्याच्या सत्कारप्रसंगी वरीष्ठ मंडल विद्युत अभियंता पी.के.भंजा, वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, सहाय्यक परीचालन प्रबंधक रामेकर आदी उपस्थित होते.

Protected Content