खामगाव प्रतिनीधी । आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाच्या वतीने आज शहरात रूटमार्चसह मॉकड्रिल करण्यात आली आहे.
सर्वप्रथम शहर पोलिस स्टेशनमध्ये तिन्ही पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना डीवायएसपी अमोल कोळी यांनी सूचित केले. त्यांनतर दुपारी १२ वाजेदरम्यान तेथून रुटमार्चला प्रारंभ झाला. महावीर चौक, फरशी, मस्तान चौक, निर्मल टर्निंग, भुसावळ चौक, केडीया टर्निंग, टिळक पुतळा या मार्गाने रूटमार्च काढण्यात आला. यामध्ये डीवायएसपी अमोल कोळी, शहर पोस्टचे ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड यांच्यासह तिन्ही पोस्टेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर टिळक पुतळा परिसरात पोलिसांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिके केली. यावेळी अचानक पोलिसांची धावपळ सुरू झाल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले होते. मात्र नंतर पोलिसांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.