गो.से. हायस्कूल येथे गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सायकल रॅलीचे स्वागत

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल येथे मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित सायकल रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले.

ही सायकल रॅली संपूर्ण जिल्ह्यात जवळपास ३६० किलोमीटर प्रवास करणार आहे. यात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ३० सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. सायकल रॅलीचे समन्वयक गिरीश कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशन चे समन्वयक गिरीश कुलकर्णी यांनी आजच्या पिढीला गांधींचे विचार कसे प्रेरणादायी ठरतील याविषयी मार्गदर्शन केले व गांधी रिसर्च फाउंडेशन च्या कामकाजाची माहिती शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी महात्मा गांधी व स्वातंत्र्य चळवळीतील विविध महत्वपूर्ण घटनांचे चित्र प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात महात्मा गांधींच्या जीवनावर व स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. यात प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना व प्रदीप पाटील यांना गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे शाळेच्या ग्रंथालयासाठी वाचनीय पुस्तकांचा संच व स्मृतीचिन्ह मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांना सोपविण्यात आले. मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुखांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार उज्वल पाटील यांनी मानले.

Protected Content