रीसॅट मिशन टेलिकॉम क्षेत्रातील संधी वाढवणार – प्राचार्य डॉ.सिंह

bhusaval 3

भुसावळ, प्रतिनिधी | भारत, चीन, जपान या देशांसाठी अंतराळातील उड्डाण केवळ विज्ञान-संशोधनाची बाब नाही, तर ते देशाच्या प्रगतीचे एक मानक म्हणून पाहिले जातेय आणि भारतीय अंतराळ तंत्रज्ञान हे स्वावलंबनाची वाट चालत असल्याने आपल्यासाठी तर या उड्डाणांची प्रतिष्ठा अधिकच मोलाची वाटते. कोणत्याही बाबतीत स्वावलंबी असणे, देशाच्या प्रगतीला पुढे नेणारे असते. त्यामुळे अंतराळ संशोधन, अंतराळ मोहिमा, इतर अंतराळ संबंधित कार्यक्रम याबाबतीतही स्वावलंबनाचा मार्ग हा देशाच्या प्रगतीला हितकारकच आहे. असे मत येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या वतीने आयोजित चर्चा सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी मांडले. ते रीसॅट -2 बीआर 1 (रडार इमेजिंग उपग्रह -2) प्रक्षेपित केल्यानंतर महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रात बोलत होते.

 

देशाच्या सुरक्षिततेसाठी अवकाश संशोधन महत्वाचे:देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तर हे अवकाश संशोधन कार्यक्रम सर्वात महत्त्वाचे आहे. याआधीच आपण अनेक देशांचे कमी वजनाचे उपग्रह पीएसएलव्ही या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या अंतराळात नेऊन त्यांच्या नियोजीत कक्षेत स्थिर केले आहेत. ज्या देशांचे उपग्रह सोडले त्यात अमेरिका, जर्मनीसारख्या प्रगत देशांचाही समावेश आहे, कारण त्या देशांना कमीत कमी पैशांत त्यांचे उपग्रह अंतराळात नेऊन पैसे वाचविण्यात स्वारस्य असते. अशी स्पष्टोक्ती प्राचार्य डॉ.सिंह यांनी दिली.

भारतीय टेलिकॉम उद्योगांचा सहभाग मोठा:
ही यशस्विता केवळ इस्रोची नाही, तर भारतातील टेलिकॉम औद्योगिक जगताचीही आहे. तेही अतिशय परिपक्व असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे, कारण भारतातील अनेक टेलिकॉम उद्योगांनी या प्रक्रियेत मोलाचा सहभाग घेतला आहे. रीसॅट मिशनचा उद्देश शेती, वनीकरण, माती आर्द्रता, भूशास्त्र, समुद्री बर्फ, किनारपट्टी देखरेख आणि पूर यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. यामुळे टेलिकॉम उद्योग (दूरसंचार) क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे कारण या क्षेत्रात टेलिकॉम क्षेत्राचा वाटा मोठा आहे, यावर आधारित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी मिळालेल्या रोजगाराच्या संधीचे सोने करावे, असे मत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गिरीष कुळकर्णी यांनी मांडले.

पीएसएलव्ही-सी 48 सह-प्रवासी म्हणून इस्त्राईल (1), इटली (1), जपान (1) आणि यूएसए (6) चे 9 ग्राहक उपग्रह देखील ठेवले. अमेरिका, जपान, इटली व इतर प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताने दूरसंचार क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. पाच दशकांच्या कालावधीत इस्रोने सर्व प्रकारचे कृत्रिम उपग्रह बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करतानाच देशात दूरसंचारात क्रांती आणली आहे. उपग्रह निर्मितीची प्रक्रिया इस्रोपुरती मर्यादित न ठेवता, उद्योगांना, शैक्षणिक, प्रशासकीय संस्थांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. देशासाठी स्वयंपूर्णता गाठतानाच इतर देशांना त्यांच्या गरजेनुसार उपग्रह बनवून देण्याची आणि ते अवकाशात प्रक्षेपित करण्याची किमयाही साधली आहे. भारतीय बनावटीच्या उपग्रहांचे हे शतक स्वातंत्र्योत्तर काळात भारताने मिळवलेल्या महत्त्वाच्या यशांपैकी एक आहे. अशी माहितीही डॉ.कुळकर्णी यांनी दिली.

प्रसंगी प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, विभाग प्रमुख प्रा. सुधीर ओझा, डॉ.गिरीष कुळकर्णी, प्रा.अजित चौधरी, प्रा. दिनेश पाटील, प्रा.जी.के.महाजन, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा. संतोष अग्रवाल, प्रा.दिपक खडसे, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.दिपक साकळे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.अतुल गाजरे, प्रा.निलेश वाणी, प्रा.राजेश पाटील, प्रा.धिरज पाटील हे उपस्थित होते.

Protected Content