तालिबान्यांची घनीना मायदेशी परतण्याची ऑफर

 

काबुल : वृत्तसंस्था । तालिबानने देश सोडून पळून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्रपती रहे अमरुल्लाह सालेह यांना अफगाणिस्तानमध्ये परतायचं असल्यास ते परत येऊ शकतात असं म्हटलं आहे.

 

तालिबाने नेते खलील उर रहमान हक्कानीने जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्षांना ही ऑफर दिलीय. अशरफ घनी, अमरुल्लाह सालेह आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांच्याशी आमचं कोणतही वैर नसल्याचं तालिबानने म्हटलं आहे.

 

अशरफ घनी, अमरुल्लाह सालेह आणि हमदुल्लाह मोहिब यांना तालिबानने माफ केलं आहे असंही हक्कानी यांनी सांगितलं. हक्कानी यांनी आम्ही सर्वांना माफी दिल्याचं म्हटलं आहे. यामध्ये अगदी तालिबानविरोधात लढणारे सैनिक असो किंवा अफगाणिस्तानमधील तालिबानला यापूर्वी विरोध करणारे नागरिक असो, आम्ही सर्वांनाच माफ केलं आहे असं हक्कानीने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे हक्कानी यांनी देश सोडून पळ काढणाऱ्या अफगाणिस्तानमधील नागरिकांना असं न करण्याचं आवाहन केलं आहे. तालिबान आता अफगाणिस्तानमधील लोकांचा सूड उगवणार आहे अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप हक्कानीने केलाय. अफगाणिस्तानमधील ताजिक्स, बलूच, हजारा आणि पश्तून जमातीमधील सर्व नागरिक आमचे बंधू असल्याचंही हक्कानीने या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. आहे ती व्यवस्था बदलण्यासाठी आमचं प्रस्थापितांविरोधात शत्रूत्व होतं असं हक्कानीने म्हटलं आहे. आता परिस्थिती बदलण्यात आम्हाला यश आलं आहे तर शत्रूत्व संपलंय असं हक्कानी म्हणाला.

 

हक्कानीने तालिबानची भूमिका स्पष्ट केली आहे. तालिबानी अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी आले नव्हते. मात्र जेव्हा अमेरिकेने तालिबान्यांच्या जमिनीवर ताबा मिळवला तेव्हा आमची संस्कृती , धर्म आणि देशाविरोधात काम करणाऱ्यांविरोधात आम्हाला शस्त्र हातात घ्यावी लागली. अमेरिका आमच्याच जमिनीवर आमच्याचविरोधात शस्त्र वापरत होते. त्याने तालिबानने शत्रूविरोधात मोठं यश मिळवल्याचाही उल्लेख केलाय. अफगाणिस्तानच्या लष्कराकडे साडेतीन लाख जवान होते. त्यांना अमेरिकन लष्कर आणि नाटोचे समर्थन होतं. तरीही आम्ही विजय मिळवला असं तालिबानने म्हटलं आहे.

 

सर्व मुस्लीम देशांनी एकत्र यावं असं तालिबानला वाटत असल्याचं हक्कानीने म्हटलं आहे. तालिबान जगातील सर्व देशांना सांगू इच्छित आहे की त्यांनी आपआपल्या नागरिकांना त्यांचे अधिकार द्यावेत. क्षमता असणाऱ्या आणि सुशिक्षित लोकांना अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये सहभागी करुन घेतलं जाईल असंही हक्कानी म्हणालाय. एकजुटीने काम करण्यास सक्षम असणाऱ्यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. आम्ही सर्व विचारसरणीच्या लोकांचं सरकार चालवण्यासाठी स्वागत करणार आहे असं हक्कानी म्हणाला.

 

घनी हे मागील रविवारी देश सोडून गेल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. राष्ट्रपती अशरफ घनी  कुटुंबासह अबू धाबीमध्ये आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिलाय. मानवतेच्या आधारावर युएई राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असं यूएईने म्हटलं आहे.

 

Protected Content