भाजप तीनशे पार करणार; राजनीतीक विश्लेषक प्रशांत किशोर यांचा दावा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशेच्या वर जागा मिळून हाच पक्ष सत्तेत येईल, असा अंदाज प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. ईशान्य भारत आणि दक्षिण भारत या फारसे अस्तित्वच नसलेल्या दोन भागांमध्येही भाजपला जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्यास राहुल गांधी यांनी पक्षातील स्वत:चे महत्त्व कमी करावे, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले.

सुरुवातीला भाजप आणि नंतर भाजपविरोधातील पक्षांसाठी राजकीय सल्लागार म्हणून काम केलेल्या प्रशांत किशोर यांच्याशी पीटीआयने संवाद साधला. ते म्हणाले, भाजपचे वर्चस्व कायम असले तरी हा पक्ष अजिंक्य नाही. गेल्या काही काळात भाजपला रोखण्याच्या तीन मोठ्या संधी विरोधकांना मिळाल्या होत्या. मात्र, आळशीपणा आणि दिशाहीन धोरण यामुळे त्यांनी त्या संधी गमावल्या.

तेलंगण, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळ या सात राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या २०४ जागा आहेत. यापैकी भाजपला २०१४ मध्ये केवळ २९ आणि २०१९ मध्ये ४७ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र ही संख्या वाढण्याचा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. जागा वाढणार असल्या तरी भाजपने एकट्याने ३७० जागा जिंकण्याबाबत व्यक्त केलेला विश्‍वास अवास्तव असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. भाजपचा प्रभाव असलेल्या उत्तर आणि पश्‍चिम भारतात त्यांना किमान शंभर जागांवर फटका बसेल, इतकी चांगली लढत विरोधकांनी व विशेषत: काँग्रेसने दिली, तर भाजपचा गड ढासळू शकतो,’ असे सांगतानाच प्रशांत किशोर यांनी, असे काही होण्याची चिन्हे नाहीत, असेही स्पष्टपणे सांगितले.

Protected Content