तरूणाचा खून करणाऱ्या टोळीतील चौघांना पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संघटीतपणे गुन्हेगारी कारवाया करत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सदगुरू कॉलनीतील तरूणाचा खून करणाऱ्‍या पाच जणांच्या टोळीवर काही दिवसांपूर्वी मोक्का लावण्यात आला होता. बुधवारी १ फेब्रुवारी रोजी पाच पैकी चौघांना जळगाव विशेष न्यायायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चौघे एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, फटाके फोडण्याच्या कारणावरून संजयसिंग प्रदीपसिंग टाक (१९) याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. ही घटना २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी रात्री सदगुरू कॉलनीत घडली होती. याप्रकरणी मोहनसिंग बावरी (१९), मोनूसिंग बावरी (२३), जगदीशसिंग बावरी (५२), सतकौर बावरी (४५), सोनूसिंग बावरी (२४, सर्व रा. सद्गुरू कॉलनी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील टोळीवर मकोका लावण्यात यावा यासाठी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. नंतर हा प्रस्ताव मंजूरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्याकडे सादर झाला होता. त्यांनी मकोका लावण्याची परवानगी दिल्यानंतर टोळीवर मकोका लावण्यात आला. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी मोहनसिंग बावरी, मोनूसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी, सतकौर बावरी या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेवून बुधवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता विशेष न्यायाधीश डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनावणीअंती चौघांना ८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

Protected Content