डॉक्टर्सच्याही अडचणी समजून घ्या- डॉ. विलास भोळे (ब्लॉग)

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर देशभरातील डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचारी अहोरात्र कार्यरत असून त्यांच्या अडचणीदेखील समजून घेण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात ख्यातनाम स्त्रीरोग तज्ज्ञ तथा शहर संघचालक डॉ. विलास भोळे यांनी मांडलेले मत आपल्याला सादर करत आहोत.

चीन या देशातून सुरु झालेली ह्या दुर्मिळ करोना विषाणूच्या साथीनी नाही म्हणता म्हणता जगभरात पाय व दहशत पसरविण्यास सुरुवात केली.२२ मार्चचा जनता कर्फ्यु व पंतप्रधानांनी जाहीर केलेले लॉक डाऊन हे या दृष्टीने शासनाने उचललेली महत्वाची पाऊले.दोन दिवसांपासून या विषयांचे विश्‍लेषण करण्यासाठी व लिहीण्यासाठी टाळत होतो पण आज ओपिडीत अनुभवलेले प्रसंग यामुळे शेवटी लिहीण्यास सुरुवात केली.

पहिला प्रसंग- आज सकाळच्या ओपिडीत एक रुग्ण तपासणीस आली होती.तीचे दुसर्‍या स्त्रीरोगतज्ञाकडे सिझेरियन झाले होेते.टाक्यांचा त्रास होत असल्याने सिझेरियन करणारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने व घराशेजारील महिला स्त्रीरोगतज्ञांनी तपासणी नाकारल्यामुळे ती रुग्ण माझ्याकडे तपासणीस आली.

दुसरा प्रसंग- संध्याकाळी एका स्वयंसेवकांचा फोन आला व त्यांचे परिचित उच्चभ्रू कुटूंबातील महिलेस खूप ताप व खोकला येत असल्याने त्यांचे नामवंत फॅमिली फिजिशियन यांनी दवाखाना बंद ठेवल्याने व फोनही उचलत नसल्याने कोणाकडे जावे हा प्रश्‍न त्यांना पडला होता.मला फोन करण्याआधी त्यांनी अजून इतर परिचित फिजिशियन यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तेथेही फोन बंद करुन ठेवल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.मला रुग्णाची लक्षणे सांगितल्यावर त्यांना मी रुग्णास करोनाची तपासणी करुन घेण्याचा सल्ला दिला.

या दोन प्रसंगांवरुन व विविध सोशल मिडिया ग्रुपवरील मेसेज वाचल्यावर असे जाणवतेय की बहुतांशी डॉक्टरांची हॉस्पिटल बंद ठेवण्याची मानसिकता आहे यात निश्‍चितच स्वतःच्या व हॉस्पिटल इमारतीतच वरच्या मजल्यावरील वास्तव्यास असणार्‍या कुटूंबाच्या सुरक्षेचा विचार असू शकतो तसेच वरील प्रसंगातील फिजिशियन यांचेकडे कदाचित नेहमीच रुग्णांचा ओघ प्रचंड असल्याने क्रॉस इन्फेशन टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा पण फोनवर सल्ला देणे रास्त झाले असते.

मागील सात दिवसांतील एक अजून निरिक्षण असे की काही तरुण डॉक्टरांनी रुग्ण तपासणीचा खूप बावू करुन घेतलेला दिसतयं.अगदी आईवडिल नाही म्हणतात अशीही कारणे ऐकावयास आली.यामुळे भूतकाळातील काही गोष्टी आठवल्यात. मला आजपर्यंत अशी आडकाठी घरातून कधी वयोवृद्धाकडून झाली नाही .जे जे हॉस्पिटल व कामा हॉस्पिटल येथे एमडी करत असतांना जेव्हा एचआयव्ही व पांढरा काविऴ च्या रुग्णांवर शस्त्रक्रियेची गरज पडायची तेव्हा ती कोण करणार तर मी नेहमी पुढे असायचो. प्रॅक्टीस सुरु केल्यावरही हा पायंडा सुरुच होता.परंतु काही वर्षातच असे लक्षात आले की कर्मचारी व सफाई कामगार या रुग्णांच्या खोलीत जात नाही व त्यांची काळजी घेत नाही. त्यानंतर या केसेस अतिदक्षता हॉस्पिटल मधे करण्यास प्राधान्य दिले.

२२ मार्चला शासनाने रुग्णलयातील गर्दी टाळण्यासाठी डॉक्टरांनी फक्त अत्यावश्यक रुग्ण हाताळावेत अशा सूचना दिल्यात.पण दुसर्याच दिवशी शासनाने डॉक्टरांनी सर्व रुग्ण तपासावेत असे आदेश काढलेत. कदाचित त्यांना कोणी हुशार अधिकार्याने लक्षात आणून दिले असेल की ८० % आरोग्य व्यवस्था ही या देशात खासगी रुग्णालयात दिली जाते व शासनाने खासगी रुग्णालयातील ओपिडी बंद केली तर तोकडी एका व्हेंटिलेटरवर चालणारी शासकीय अर्थव्यवस्था रुग्णासाठी पुरेशी होणार नाही. त्यामुळे २४ तासात निर्णय बदलला व खासगी आयसीयु अधिग्रहीत करता येत हे पण त्यांच्या लक्षात अधिकार्यांनी आणून दिले.असो करोनाची गंभिरता वाढल्यास हे करणे आवश्यक आहे व त्यासाठी आयएमएचे वर्तमान पदाधिकारी शासनास निश्‍चितच सहकार्य करतील.शासनातर्फे अलिकडेच अनेक खासगी डॉक्टरांचा त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल सत्कार झाला होता.ते डॉक्टर्स निश्‍चितच शासनास सहकार्य करतील,रुग्णांची तपासणीही करतील.

आता या विषयाची दुसरी बाजू बघुया…जनता कर्फ्यु व टोटल लॉक डॉऊन यामुळे जे थोडे फार डॉक्टर्स सेवा देण्यास इच्छुक आहेत त्यांनाही काही अडचणी निर्माण झाल्यात.हॉस्पिटल कर्मचार्‍यांना विशेष करुन नर्सेसला हॉस्पिटल पर्यंत प्रवासासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही किंवा शासनाने तशी काही पर्यायी व्यवस्थाही केलेली नाही.त्यामुळे हॉस्पिटल सेवा देण्यास पुरेशी कर्मचारी नाहीत. नाईलाजास्तव इच्छुक सेवाभावी डॉक्टरांना सुद्धा दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. डॉक्टरांच्या घरी घरकाम व स्वयंपाकासाठी येणार्‍या स्त्रियांना प्रवासाचे साधन सुविधा नाही.त्यामुळे पुरुष व महिला डॉक्टरांवर घरकामाचीही जबाबदारी येवून पडली.आता पूर्वी सारखे एकत्रित कुटूंबे नाहीत त्यामुळे घरात कामे करु शकणार्‍या व्यक्तीही नाहीत.सकाळ संध्याकाळी रुग्ण तपासतांना घातलेले कपडे स्वतः धुण्याचा एक उद्योग वाढलाय.तर टोटल लॉक डॉऊन जाहीर करतांना या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक होते व पर्यायी व्यवस्था शासनाने पुरविणे अपेक्षित होते.

आपण करोनाची गंभीरता वाढू नये अशी वैयक्तिक रित्या घरातच प्रार्थना करु या व दुर्दैवाने हे वाढलेच तर शासनाने शहरातील सर्व आयसीयु कर्मचार्यांसहित अधिग्रहीत करावी व इतर सर्व ओपिडीज बंद करुन सर्व डॉक्टर्सना एक मोठी जागा उपलब्ध करुन देवून ओपिडीज तयार कराव्यात व रोटेशन पद्धतीने डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करुन घ्यावा.तसेच डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची सर्व साधने व विमा उपलब्ध कराव्यात. असाच उत़्कृष्ट उपक्रम शिरसोली ग्रामपंचायतीने राबविल्याचे आजच वाचण्यात आले. जनरल प्रॅक्टीशन डॉक्टरांचीही मदत रुग्णतपासणी व शस्त्रक्रियांना सहकार्य करण्यासाठी होऊ शकतो.

हे विवेचन लिहीत असतांना दूरदर्शनवरील दोन बातम्या कानावर पडल्यात.शासन सेवा बंद करण्यार्‍या डॉक्टरांची व हॉस्पिटलची नोंदणी रद्द करणार.व डॉक्टर व नर्सेसला रस्त्यावर अडविणार्‍या पोलिसांवर कारवाई करणार. आता मात्र वरिष्ट, कनिष्ठ,तरुण,वयस्कर, नामवंत व साधारण सर्व डॉक्टर्स उद्यापसून रुग्ण तपासणी सुरु करणार.

सुरक्षेसाठी व उपचारासाठी लागणारी बहुतांशी यंत्रसामुग्री व किट्स हे चीनहून आयात होत असत.आता चीनवर अतीजास्त अवलंबून राहण्याचा फटका इतर देशांना व भारतालाही बसतोय. पंतप्रधान आता व्हेंटिलेटर्स, सॅनिटायजर्स व सुरक्षा किट्सचे उत्पादन भारतात करण्याचे आवाहन करीत आहेत. हा तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार झाला.या सर्व आवश्यक वस्तूंचे निर्माण भारतातच होणे व स्वावलंबी होणे ही काळाची गरज आहे पण ते होणे तेव्हाच शक्य जेव्हा भ्रष्टाचाराचा व कमिशनचा भस्मासूुराचे येथे उच्चाटन होईल.तसे होणे नजिकच्या काळात शक्य वाटत नाही कारण भ्रष्टाचार हा आपल्या देशवासियांच्या रक्तात भिनलाय.असो करोनाशी दोन हात करण्याचे शासनातर्फे होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे म्हणायला काहीही हरकत नाही.

घरीच थांबा । काळजी घ्या । सहकार्य करा । अत्यावश्यक असेल तरच दवाखान्यात जा ।सकस आहार घ्या । प्रतिकार शक्ती वाढवा ।

डॉ. विलास भोळे
एमडी स्त्रीरोगतज्ञ
मातृसेवा हॉस्पिटल जळगाव
शहर संघचालक
माजी सचिव आयएमए जळगाव

Protected Content