डिसेंबर महिन्यात ‘मॉडर्ना इंक’ कंपनीच्या लशीला मंजुरीची शक्यता

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिकेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. फायजरनंतर आता आणखी ‘मॉडर्ना इंक’ या कंपनीने लस मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. डिसेंबर महिन्यात लशीला मंजुरी मिळेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

सध्या मॉडर्ना इंक कंपनीच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे. यामध्ये ३० हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. चाचणी दरम्यान ५० टक्के स्वयंसेवकांना लशीचे डोस देण्यात आले. तर, उर्वरीत स्वंयसेवकांना प्लॅस्बो (खोटं औषध) देण्यात आले.

लस प्रभावाची माहिती देणारे विश्लेषण अहवाल नोव्हेंबर महिन्यात येण्याची दाट शक्यता असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बँसेल यांनी म्हटले आहे.

या लस चाचणीच्या अंतरीम विश्लेषण अहवालात ५३ स्वयंसेवकांना चाचणी दरम्यान कोरोनाची बाधा, अथवा त्यांच्यात लक्षणे आढळली का, हेदेखील पाहिले जाणार आहे. त्याशिवाय लस घेणाऱ्या व्यक्तींमध्ये लशीचा परिणाम दिसून आल्यास कंपनी लस मंजुरीसाठी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये आपात्कालीन परिस्थितीत लस वापरास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लस सुरक्षित आहे की नाही, याची माहिती करून घेण्यासाठी जवळपास ५० टक्के स्वयंसेवकांवर दोन महिने देखरेख ठेवणे आवश्यक आहे. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड होतो का, याकडे लक्ष दिले जाते.

फायजरने विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू आहे. या चाचणीची माहिती, निष्कर्ष समोर येण्याची प्रतिक्षा केली जात आहे. लस कितपत प्रभावी आहे, त्याची सुरक्षिता किती आहे, याची माहिती मिळाल्यानंतर लशीचे उत्पादन वाढवता येऊ शकते. या लस चाचणीचे परिणाम सकारात्मक आल्यानंतर फायजर कंपनी आपली भागिदार असलेली जर्मन कंपनी BioNTech SE सोबत नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लस मंजुरीसाठी अर्ज करणार आहे. इतर देशांमध्ये कधी अर्ज करणार याबाबत मात्र कंपनीने काहीही स्पष्ट केले नाही. डिसेंबरमध्ये लस उपलब्ध होणार असल्याचे याआधीच कंपनीने स्पष्ट केले होते.

Protected Content