ट्रोलिंग मंत्री गटाची अधिकृत घोषणा करा — शिवसेना

 

मुंबई : वृत्तसंस्था । रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या राजकीय खडाजंगीवरून आता शिवसेनेनं थेट ट्रोलिंग मंत्री गटाला बळ देण्यासाठी मोदींनी तशी अधिकृत घोषणा करावी असा टोला लगावला आहे.

 

केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकार यांच्यात पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी प्रत्युत्तर दिलं.

 

महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सगळीकडून रेमडेसिवीरची ओरड होत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर देऊ नका, असं केंद्राने रेमडेसिवीर औषध उत्पादक कंपन्यांना सांगितल्याचा दावा केला होता. त्यावर पीयूष गोयल यांनी लागलीच ट्विट करत संताप व्यक्त केला होता. गोयल यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावरून शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींना टोला लगावला आहे.

 

“राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ट्रोलिंग मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गट पुन्हा महाराष्ट्राविरोधात किंचाळायला लागला आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतंय की ट्रोलिंग मंत्री गटाला सशक्त करण्यासाठी माननिय पंतप्रधानांनी तशी अधिकृत घोषणाच करायला हवी. त्यामुळे कमीतकमी त्यांच्या जगण्याच्या उद्दिष्टाची तरी जाणीव होईल,” असं म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदी आणि पीयूष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Protected Content