Home Cities भुसावळ भाजपाला भुसावळात मोठा धक्का; माजी सभापती राजेंद्र चौधरी समर्थकांसह शिवसेनेत दाखल

भाजपाला भुसावळात मोठा धक्का; माजी सभापती राजेंद्र चौधरी समर्थकांसह शिवसेनेत दाखल


वरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रमुख समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने भुसावळ आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपातील स्थानिक नेतृत्वाशी झालेल्या वैचारिक मतभेदांनंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपाला रामराम ठोकला होता. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलच्या सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत राजेंद्र चौधरी यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राज्याचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे तसेच माजी खासदार उन्मेश पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेच्या नेतृत्वाने राजेंद्र चौधरी यांचे स्वागत करत त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

राजेंद्र चौधरी यांच्यासोबत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रा. डॉ. जतीन मेढे, भुसावळ शेतकी संघाचे संचालक प्रकाश चौधरी, सुनसगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक जे. पी. सपकाळे, ट हाकडीचे माजी उपसरपंच शांताराम चौधरी, अंजनसोंडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस संघरत्न सपकाळे, अल्पसंख्यांक आघाडीचे बाबूलाल भाई आणि युवा कार्यकर्ते भूपेंद्र तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

भाजपातील निष्ठावान कार्यकर्त्यांना अन्यायकारक वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण झाल्याने हा निर्णय घेतल्याचे राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले. रावेर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात रावेर लोकसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना, “पुढील काळात विविध पक्षांतील अनेक महत्त्वाचे नेते शिवसेनेत प्रवेश करतील,” असा दावा केला. तर माजी खासदार उन्मेश पाटील यांनी राजेंद्र चौधरी यांच्या प्रवेशामुळे भुसावळ तालुका आणि रावेर मतदारसंघातील राजकीय चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचे मत व्यक्त केले.

राजेंद्र चौधरी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


Protected Content

Play sound