ज्या दिवशी काश्मिरात काळा बर्फ पडेल, त्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार ! : आझाद

 

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ज्या दिवशी काश्मिरात काळा बर्फ पडेल, त्याच दिवशी आपण भाजपमध्ये प्रवेश करून असे वक्तव्य करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना उत्तर दिले आहे.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे ४ दशकांच्या संसदीय कालावधीनंतर राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या कामाचं खूप कौतुक केले होते. इतकचं नव्हे तर एका घटनेचा उल्लेख करत मोदींना अश्रूही अनावर झाले.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणानंतर सोशल मीडियात राजकीय चर्चा सुरु झाल्या. गुलाम नबी आझाद हे भाजपात प्रवेश करतील असं सांगितलं जात होतं, परंतु या सर्व चर्चेवर खुद्द गुलाम नबी आझाद यांनी भाष्य करत त्यावर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत आझाद म्हणाले की, ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन

 

या मुलाखतीत आझाद यांनी सांगितले की,  जे लोक अशाप्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांना माझ्याबद्दल काही माहिती नाही. जेव्हा राजमाता शिंदे विरोधी पक्षाच्या उपनेत्या होत्या तेव्हा माझ्यावर आरोप केले होते. तेव्हा मी सांगितलं होतं अटलबिहारी वाजपेयी, शिंदे आणि एल. के. अडवाणी यांची कमिटी बनवून १५ दिवसांत रिपोर्ट द्यावा, कमिटी जी शिक्षा देईल ते मान्य असेल. त्यावेळी वाजपेयी सभागृहात म्हणाले होते, मी सभागृह आणि गुलाम नबी आझादांची माफी मागतो, कदाचित राजमाता शिंदे या त्यांना ओळखत नाही परंतु मी त्यांना ओळखतो असं आझाद यांनी सांगितले.

 

निरोपावेळी काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रतिक्रियेवर आझाद म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. आता आपल्याला पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी मिळून काम करायचं आहे असं सांगितले, त्यानंतर मी सोनिया गांधी यांची भेट घेतली, तेव्हा निवडणुकीसाठी तयार राहण्याचं त्या म्हणाल्या.

Protected Content