‘ही’ लोकशाहीसाठी धोक्याची घंटा : शरद पवारांचा इशारा

उदगीर-लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा | देशात सध्या विशिष्ट विचारधारेचा प्रपोगंडा वाढीस लागला असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी दिला.

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आजपासून अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ केला. याप्रसंगी उदघाटनपर सत्रात खासदार शरद पवार  यांनी समकालीन घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली. या विचारधारेतून गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद आदी वाद जन्माला आले. मात्र, सध्याच्या काळात ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारची प्रोपागंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते असे ते म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावताना दिसतो आहे. साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी केले. साहित्य हे मुक्त असावे याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला ते बांधील नसावे. अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते असे पवार साहेब यांनी म्हटले. साहित्यिकांनी समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे असे आवाहन त्यांनी केले. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन हा प्रोपागंडा राबवणे सुरू केले आहे. चित्रपट ह्या कलाक्षेत्रात त्याचा उघड-उघड झालेला शिरकाव आपणास दिसत असल्याचे पवार यांनी म्हटले.

Protected Content