जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल २९ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्येने साडेपाचशेचा आकडा पार केला आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून रूग्णसंख्येचे अपडेट दिले आहे. यानुसार भडगाव, नशीराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ, जळगाव येथील 149 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त. 120 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भडगावचे चार, चोपडा, सावदा, भुसावळ, उमाळा, विटनेर येथील प्रत्येकी एक तर जळगाव शहरातील जखनीनगर, तांबापुरा, सालार नगर व इतर भागातील वीस व्यक्तींचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 557 झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
जळगाव शहरात आज तब्बल २० रूग्ण आढळून आले आहेत. हे रूग्ण शहरातील सालार नगर, तांबापुरा व जाखनी नगर या भागातील आहेत. जळगावात मध्यंतरी रूग्ण संख्या ही कमी प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले होते. मात्र दोन दिवसांपासून रूग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेष करून तांबापुरा भागातील एका कोरोना बाधीताच्या अंत्यसंस्कारानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांना संसर्गाचा धोका असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
तर दुसरीकडे भडगावातील रूग्णांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. आज भडगावात चार रूग्ण आढळून आले असल्याने तेथील आरोग्य यंत्रणांनी संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्या परिसरात फवारणीसह अन्य उपाययोजना केल्या असून हा भाग सील करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता कोरानाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली आणि विटनेर येथे आधीच रूग्ण आढळून आले होते. यात आज पुन्हा विटनेरला एक रूग्ण आढळला आहे. तर आज उमाळा गावात देखील एक रूग्ण कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.