त्यांच्या संपर्कातील कोणीही पॉझिटिव्ह नाही — आरोग्यमंत्री टोपे

 

मुंबई, वृत्तसंस्था ।कोरोनाच्या नव्या प्रकारचे राज्यात आठ रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असून नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचं आपण सक्तीने पालन करत असल्याचं सांगत त्यांनी राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन होणार असल्याची माहिती दिली. त्यांनी जनतेने जागरुक राहावं, घाबरण्याचं कारण नाही. चिंता करु नका पण काळजी घ्या असं आवाहन केलं. व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. ७० टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्यावी, सजग राहावं इतकंच महत्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

राज्यात सध्या आठच रुग्ण असून त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु आहे. त्यांच्या संपर्कातील कोणीही पॉझिटिव्ह आढळलेला नाही. कोणी पॉझिटिव्ह आढळला तरी कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालाय का हे आधी तपासावं लागेल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

७ जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार असून अनेक मुद्दे मांडणार आहेत. ज्या त्रुटी वाटत आहेत त्याबद्दल देखील सांगणार आहोत. ८ तारखेला प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन करणार असून त्याच्यातून आपली यंत्रणा तपासली जाईल. यामध्ये काही त्रुटी वैगेरे आहेत का? पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यात समन्वय आहे का? याचीही पाहणी होईल. ज्यावेळी आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवू त्यावेळी कोणतीही अडचण न येता कार्यक्रम राबवता यावा यादृष्टीने हे सर्व करणार आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Protected Content