जळगाव प्रतिनिधी । सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे शेतकर्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी रोख रकमेची आवश्यकता असल्याचे जिल्हा बँकेने शेतकर्यांना पीक कर्जाची रक्क रोख स्वरूपात द्यावी असे निर्देश आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. तर, याबाबत जिल्हा बँकेच्या एमडींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने जिल्हाधिकार्यांनी त्यांची जोरदार खरडपट्टी केली.
याबाबत वृत्त असे की, आज गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा विश्रामगृहात कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांना रोखीने कर्ज मिळावे असे निर्देश दिले. या संदर्भात ना. पाटील म्हणाले की, सध्या शेतीचा खरीप हंगाम असल्याने शेतकर्यांना बी-बीयाणे, खते यासाठी तातडीने पैशांची आवश्यकता असल्याने सहकारी बँकांनी शेतकर्यांना आवश्यक असलेली रक्कम एकरक्कमी रोखीने देण्यात यावी. जेणेकरुन त्यांना वारंवार रक्कम काढण्यासाठी एटीएमला यावे लागणार नाही अशी सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत केली.
दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निेर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना भ्रमणध्वनीवरून कॉल करून माहिती घेतली. याप्रसंगी देशमुख यांनी त्यांना व्यवस्थीत माहिती न देता उडवाउडवी केल्याने जिल्हाधिकार्यांनी संतप्त होऊन त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. सर्वांसमोर घडलेल्या या प्रकाराची सर्वत्र एकच चर्चा होती.