आर.के. वाईन्स मद्य तस्करी प्रकरण; पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ बडतर्फ

जळगाव (प्रतिनिधी) । शहरातील आर.के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी प्रकरणात पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीस महासंचालक यांचे बडतर्फचे आदेश प्राप्त झाले.

शहरातील आर.के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुकानात छापा टाकून मद्यविक्रीचा डाव हाणून पाडला होता. याप्रकरणी प्राथमिक तपासात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर यात गुन्ह्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते. यात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कलीन पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस नाईक जीवन पाटील, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे नाईक संजय जाधव, मुख्यालयातील पोलिस नाईक मनोज सुरवाडे व तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ भारत पाटील यांचा देखील बेकायदेशीर दारूविक्रीत सहभाग असल्याचे समोर आले होते. दरम्यान या गुन्ह्याची चौकशी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ आणि चारही पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रणजित शिरसाठ यांची पोलीस अधिक्षकांनी उचलबांगडी करत पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर मंगळवारी शहरातील आर.के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी प्रकरणात पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव व मनोज सुरवाडे या तीन पोलिसांना बडतर्फ तर भारत पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. सह आरोपी म्हणून रणजित शिरसाठ यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत पोलीस महासंचालक यांचे बडतर्फचे आदेश प्राप्त झाले.

Protected Content