जामनेर पुरवठा विभागाचे दुर्लक्ष, शेंदूर्णीकरांना रेशन मालाची प्रतीक्षा

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । तालुक्यासह शेंदूर्णी येथील रेशनच्या दुकानांमध्ये जामनेर तालुका पुरवठा विभागाचे वतीने मे महिन्याची १५ तारीख उजाडली तरी रेशन मालाचा पुरवठा करण्यात आला नसल्यामुळे रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे.

मे महिन्याची १५ तारीख येऊन देखील रेशन न आल्याने शिधा पत्रिकाधारक रेशन दुकानांवर माल घेण्यासाठी रोजच चकरा मारत आहेत. त्यांना उत्तरे देता देता दुकानदारांना नाकी नऊ येत आहे. कारण गावात चार सहकारी संस्थांचे रेशन दुकाने असून काही खाजगी दुकाने आहेत. प्रत्येक महिन्यात खाजगी दुकानांवर पुरवठा विभाग आधी धान्य पुरविते व सहकारी संस्थांना नंतर माल पुरविते म्हणून संस्थेच्या दुकानात का माल उपलब्ध होत नाही असा प्रश्न शिधा पत्रिकाधारक विचारीत आहेत. मागील महिन्यात १० तारखेला पात्र शिधा पत्रिकाधारकांचे नियमित धान्य तालुक्यातील सर्व रेशन दुकानांवर पोहचविण्यात आले होते. ते धान्य वाटता वाटता २० तारीख उजाडली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून मोफत वाटण्यासाठी प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ उपलब्ध झाला. तो वाटप करतांना ३० तारीख उजाडली होती. तरीही रेशनचे धान्य घेण्यासाठी रेशन दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशियल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. आता तर अर्धा महिना उलटूनही रेशनवर पुरवठा विभागाच्या वतीने धान्य पोहचविण्यात आले नसल्याने रेशनवर धान्य येताच गर्दी होणार असून पुन्हा सोशियल डिस्टन्स पाळून शिधा पत्रिकाधारकांना धान्य पुरवितांना रेशन दुकानदारांची धांदल उडणार आहे.

Protected Content