कोरोना लसीकरण हे प्रत्येकासाठी मिशन व्हावे – डॉ. निकम

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी लसीकरण हे आवश्यक असून याचे मिशन व्हावे अशी अपेक्षा डॉ. राहूल निकम यांनी व्यक्त केली. ते येथील गरूड महाविद्यालयातर्फे आयोजीत ऑनलाईन वेबिनारमध्ये बोलत होते. 

राज्य शासनाने ह्या कोविडच्या गंभीर परिस्थितीत जनतेसाठी दि. १ मे पासून व्यापक स्वरूपात लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. नक्कीच लसीकरणामुळे कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यास मदत होईल. याच पार्श्‍वभूमीवर अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक व ग्लोबल युवा फाउंडेशनच्या वतीने एक दिवसीय वेबिनार चे आयोजन दि.३० रोजी झूम आणि युट्यूब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील, उदघाटक कबचौउमवि चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नावरे तर प्रमुख मार्गदर्शक शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम हे होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाच्या रासेयो एककाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी केले. त्यांनी गेल्या वर्षा पासून कोरोना काळात रासेयो एकक करीत असलेल्या विविध समाजपयोगी उपक्रमांची माहिती दिली तसेच लसीकरणा विषयी घेण्यात आलेल्या वेबिनारच्या आयोजना मागिल भूमिका मांडली.

या वेबिनार प्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून विद्यापीठातील रासेयो संचालक प्रा. डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी आपल्या उदघाटकीय भाषणात लसीकरणाच्या मोहिमेत रासेयो स्वयंसेवकांनी स्वतःची योग्य व सुरक्षित काळजी घेऊन मदत कार्य करावे असे आवाहन केले.तसेच त्यांनी उपस्थितांसमोर शेंदूर्णी रासेयो एकक  कोरोना काळात करीत असलेल्या समाजपयोगी उपक्रमांबद्दल कौतुक केले.

यानंतर वेबिनारचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले तज्ञ मार्गदर्शक डॉ.राहुल निकम यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातुन लसीकरणाच्या संदर्भात नागरिकांच्या मनात असणार्‍या विविध प्रश्‍नांनावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रबोधनात्मक शैलीत लसीकरणाचे महत्व तसेच लसीकरणाच्या आधी व नंतर घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

यानंतर प्रश्‍न उत्तराच्या सत्रात सहभागीसोबत संस्थेचे अध्यक्ष  संजय  गरुड यांनी उपस्थिती देऊन प्लाझमा दान करण्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया समजून घेतली.ते नुकतेच कोरोना आजाराशी लढा देऊन बरे झाले आहेत.प्लाझ्मा हा कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी उपयोगी ठरत आहे.या पार्श्‍वभूमीवर त्यांनी प्लाझमा दान करण्याचा संकल्प बोलून दाखविला. जेणे करून कुण्या बाधिताला त्याचा लाभ व्हावा. त्यांच्या या संकल्पाने उपस्थित इतरांना प्रेरणा मिळाली.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी लसीकरणाची गरज व रासेयो स्वयंसेवकांची भूमिका यावर प्रकाश टाकला. त्यांनी उपस्थितांना लसीकरणामुळे कोरोना संसर्ग कमी होण्यास खूप मदत होईल असे सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्याम साळुंखे,रविंद्र आर.बोरसे

संचालक, ग्लोबल युवा फाउंडेशन मोराड, चोपडा महाविद्यालयाचे प्रा.दिनानाथ पाटील,साक्री महाविद्यालयाचे प्रा.डॉ.योगेश चव्हाण  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या वेबिनार साठी एकूण ३२७ जणांची नोंदणी झाली त्यापैकी २९८स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. या वेबिनार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धेक सहभागी झालेले होते.

या वेबिनार चे सूत्रसंचालन रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील यांनी तर आभार प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी केले.

Protected Content