Home आरोग्य बैलगाडीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याला ‘डॉ. उल्हास पाटील’ रुग्णालयाने दिले नवजीवन

बैलगाडीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याला ‘डॉ. उल्हास पाटील’ रुग्णालयाने दिले नवजीवन

0
103


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वेळेवर झालेले अचूक निदान आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांच्या जोरावर एका अपघातग्रस्त शेतकऱ्याचे प्राण वाचवण्यात जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञांना यश आले आहे. यावल तालुक्यातील शंकर महाजन (वय ५५) हे शेतकरी शेतातून घरी परतत असताना बैलगाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते बेशुद्ध पडले होते. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांच्या कौशल्यामुळे त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी त्यांची तातडीने प्राथमिक तपासणी करून सीटी स्कॅनचा सल्ला दिला. सीटी स्कॅनच्या अहवालात महाजन यांच्या मेंदूमध्ये रक्ताची मोठी गाठ तयार झाल्याचे समोर आले. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ‘एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा’ (Extra-Dural Hematoma) असे म्हणतात. ही स्थिती अत्यंत जीवघेणी असते, कारण रक्ताची गाठ मेंदूवर प्रचंड दाब निर्माण करते, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मयूर बर्‍हाटे, डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. शार्दुल, डॉ. कोमेश नेमाडे आणि भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे व डॉ. मारीया यांच्या टीमने ‘क्रेनीओटोमी’ ही जटिल शस्त्रक्रिया सुरू केली. सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या या प्रक्रियेत डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने मेंदूमधील रक्ताची गाठ काढून टाकली आणि अंतर्गत होणारा रक्तस्त्राव यशस्वीरीत्या थांबवला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही काळ अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण देखरेखीनंतर महाजन यांची प्रकृती सुधारली असून त्यांना शुद्ध आली आहे.

विशेष म्हणजे, ही लाखो रुपयांची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. यामुळे एका सामान्य शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. अपघातानंतरचा पहिला तास हा ‘गोल्डन अवर’ मानला जातो. या वेळेत रुग्ण रुग्णालयात पोहोचल्यामुळे आणि तातडीने उपचार मिळाल्यामुळेच त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले, असे मत रुग्णालयातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या शंकर महाजन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. महाजन कुटुंबियांनी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील टीमचे आभार मानले आहेत.


Protected Content

Play sound