चाळीसगाव प्रतिनिधी । एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्यानंतर ती महिला व तिच्या आप्तांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात घडला असून या प्रकरणी अॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, पीडित महिला ही तालुक्यातील पातोंडा येथे पती आणि आजे सासूसोबत राहते. ही महिला आणि तिची आजेसासू या तालुक्यातील वाघडू शिवारात २३ एप्रिल रोजी दुपारी लाकडे तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्या प्रमोद लक्ष्मण वाणी यांच्या शेतात असतांना दोन मुले आंबे तोडत होते. यातील एक सुमारे १५ वर्षे वयाचा मुलगा झाडाखाली होता. तर दुसरा सुमारे २५ वर्षाचा तरूण हा झाडावर चढलेला होता. दरम्यान, यातील अल्पवयीन मुलाने पीडित विवाहित महिलेचा विनयभंग केला. यानंतर या दोघांनी घटना स्थळावरून पळ काढला. याप्रसंगी शेतमालक प्रमोद वाणी यांनी ही दोन्ही मुले आपल्याच शेतात कामाला येत असून मी त्यांना माफी मागायला लावतो असे आश्वासन दिले. मात्र चार-पाच दिवस उलटले तरी त्यांनी शब्द पाळला नाही.
यामुळे पिडीत महिला ही आपल्या पतीसह चाळीसगाव पोलीस स्थानकात गेली. तेथून प्रमोद वाणी यांना फोन लावला असता त्यांनी या सर्वांना वाघडू ग्रामपंचायतमध्ये बोलावले. या अनुषंगाने २७ एप्रिल रोजी तेथे संबंधीत मुलाने पिडीत महिलेची माफी मागितल्याने या विषयावर पडदा पडला असे वाटले. मात्र काही क्षणांमध्येच छेड काढणार्यांसह तेथे आलेल्या लोकांनी पीडित महिला, तिची आजेसासू, पती आणि सोबत आलेल्या महिलेला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली.
यामुळे पिडीत महिलेने चाळीसगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार विनयभंग करणारा मुलगा, नंतर मारहाण करणारा तरूण व त्यांना मदत करणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. या अनुषंगाने पोलीस स्थानकात विनयभंग करणारा मुलगा; राकेश रामलाल पाटील, किशोर रवा पाटील, भाऊसाहेब दिनकर पाटील आणि किशोर पाटील याचा चुलतभाऊ (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात भादंवि कलम ३२३, ३२४, ३५४, ३५४-अ आणि अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.