बोदवड तालुक्यातील ५१ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुकावासियांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पाणी पुरवठा योजनेबाबत आ. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली आहे.

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आ. चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मयत पोलीस कर्मचारी अजय चौधरी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.  यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आले असता आमदार पाटील यांनी बोदवडची ५१ गावे पाणीपुरवठा योजना यात असलेल्या त्रुटी व समस्यांबद्दल चर्चा करून सदरील योजनेसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा करून बोदवड वासियांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावी अशी मागणी केली. यावेळी सर्व त्रुटी व अडचणी जाणून घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढील आठवड्यात सदरील योजनेसंदर्भात तातडीने आढावा बैठक घेण्याच्या सांगितले व संबंधित विभागाच्या  अधिकार्‍यांना बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

 

सन १९९५ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नावाने कार्यान्वित  झाली त्यावेळी या योजनेत प्रती माणसी ५५ ते ७० लि. पाणी देण्याची तरतूद करण्यात आली होती. यानंतर १.जानेवारी २०१८ ला सदरील योजना पुनर्जीवित होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला परंतु या योजनेत भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा कुठलाही सारासार विचार न करता उलट पक्षी  प्रती माणसी पाणी देण्याचे प्रमाण कमी करून  प्रती माणसी ४० लि. पाणी देण्याची तरतूद करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा यांत्रिकी विभागात देखील अनेक त्रुटी आणि अडचणी ठेवून हि योजना तयार करतांना दिसून येते केवळ कागदावर निर्माण झालेली हि अपूर्ण योजना आज रोजी बोदवड वासियांची तहान भागविण्यास सपशेल अपयशी ठरलेली असल्याची माहिती पालकमंत्र्यांना याप्रसंगी देण्यात आली.

 

सदर पाणी पुरवठा योजना  ही नव्याने करणे अपेक्षित असतांना तीच योजना पुनर्जीवित करून योजनेची तत्कालीन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी घेऊन जाणारी पाईप लाईन ची क्षमता देखील कमी करून भविष्यातील लोकसंख्येचा विचार करण्यात आला नाही. यामुळे इतर त्रुटी अडचणी यांचा सारासार विचार न करता तसेच तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी लक्ष न दिल्याने संबंधित विभागाने तोडक्या स्वरूपाची योजना तयार करून कंत्राटदाराच्या घश्यात योजना घालण्याच्या हेतूने त्रुटी कायम ठेवून योजना पुनर्जीवित केली. यानंतर पुनर्जीवित करून योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण करून ५ वर्ष उलटूनही  जि. प.ग्रामीण पुरवठा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलेली नाही. तसेच आजतागायत ही योजना सक्षम रित्या कार्यान्वित नसल्याने आज रोजी बोदवड तालुका हा तहानलेला असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच सदरील योजना हाताळणारे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पत्रव्यवहारानुसार देखील खालील प्रमाणे त्रुटी योजनेत दिसून येत आहे.

 

भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागामार्फत ८१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित योजनेचे काम झाले असून ५१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट ५१ गावांपैकी २८ गावांना पाणीपुरवठा चालू आहे. उर्वरित २३ गावांना अद्यापही पाणीपुरवठा सुरू नाही. सुरू असलेल्या २८ गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा रोटेशन पद्धतीने होत आहे. सदर योजनेतील पाईपलाईन वारंवार लिकेज होत आहे. त्यामुळे ५१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे. तसेच सदर काम डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये असल्याने सदर दुरुस्ती योजना कंत्राटदाराने करणे आवश्यक आहे. मात्र बर्‍याचदा संबंधित मक्तेदाराकडून दुरुस्तीचे काम व लिकेज काढण्याचे कामास टाळाटाळ होत आहे व विलंबाने होत आहे. असे मुद्देच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग , जिल्हा परिषद जळगाव यांनी  उपविभागीय अभियंता , महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग , भुसावळ यांना दिलेल्या पत्रात दिसून येत असल्याचे याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

आमदारांशी झालेली चर्चा व संबंधित अधिकार्‍यांनी मांडलेली व्यथा ऐकून घेतल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील  यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना करून सदर योजने बाबतीत मुंबई येथे मंत्रालयात पुढील आठवड्यात संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक लावून सदर योजनेतील त्रुटी दूर करून बोदवड तालुक्यातील ५१ गावांना दररोज शुद्ध व मुबलक  प्रमाणात पाणीपुरवठा करणे शक्य होण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याचे सांगितले.

Protected Content