जळगावात १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञाला अरणी मंथन करून प्रारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील शिवराजे फाउंडेशनतर्फे आयोजित १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञाला गुरुवार दि. १ डिसेंबर रोजी पहाटे भाविकांच्या उत्साहामध्ये प्रारंभ करण्यात आला.

 

आज दि.  गुरुवार दि. १ डिसेंबर रोजी पवित्र तीर्थक्षेत्रावरून आलेल्या ब्रह्मऋषींनी केलेल्या मंत्रोच्चारात आणि अरणी मंथनाद्वारे अग्नी प्रज्वलित करून पवित्र गोपाल कृष्ण महायज्ञ सुरू करण्यात आला. दिवसभरात वृंदावन निवासी सोपानदेव महाराज यांच्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेलादेखील प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली आहे. नेहरू नगर येथील शिवराजे फाउंडेशनतर्फे श्रीमद संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहांचे दि. १ ते ७ डिसेंबर दरम्यान बाबा लॉन्स, मोहाडी रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत शहरात प्रथमच १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञदेखील होत असून दिवसभर धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या जागेचे तुलसी विवाहाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून संत महंतांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले होते. महायज्ञाच्या पूजा विधीसाठी श्रीधाम वृंदावन येथील भगवान कृष्ण महाराज, काशी विश्वनाथ बनारस येथील सत्यम मिश्रा महाराज, चित्रकुट येथील विभाष शर्मा महाराज, अयोध्या येथील ऋषिराज महाराज,उज्जैन येथील कुलदीप शर्मा महाराज या महान पंडितांचे जळगाव नगरीत आगमन झाले आहे. सुमारे ५४० जोडप्यांच्या उपस्थितीत दररोज १०८ कुंडी महायज्ञ पूजन सकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.

 

गुरुवारी १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञला पहाटे ६ वाजता प्रारंभ झाला. वंदना व सुभाष चौधरी या दांपत्याच्या उपस्थितीमध्ये ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चार करीत महायज्ञ कार्याला सुरुवात केली. सर्व महान पंडितांच्या उपस्थितीमध्ये अरणी मंथन करण्यात आले. यावेळी महिला पुरुषांसह भाविकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अरणी मंथन करून त्याची अग्नी ही सर्व कुंडांमध्ये प्रज्वलित करण्यात आली. कुंज प्रभू सोपानदेव खैरनार (वय -४ ) या मुलाने हात लावल्यावर आग प्रज्वलित झाली.

 

अध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या १०८ कुंडी गोपाल कृष्ण महायज्ञला मोठे महत्त्व आहे. जगामध्ये मनःशांती लाभावी. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये संकटे असतात. मात्र त्या संकटांमध्ये पुढे जाण्यासाठी आत्मिक बळ मिळावे, तसेच आयुष्यातील विविध संकट दूर व्हावी याकरिता या गोपाल कृष्ण महायज्ञाचे फार मोठे महत्त्व यावेळी ब्रह्मवृंद पंडितांनी भाविकांना सांगितले.

 

Protected Content