अमळनेरात कानबाईची मिरवणूक हर्षोल्हासात

अमळनेर प्रतिनिधी । खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात होत असतो. अवघ्या दीड दिवसांचा हा सण खान्देशातील प्रत्यके कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी वाद्यांच्या तालावर कानबाईची विसर्जन मिरवणूक काढतात. दरम्यान, अमळनेर तालुक्यात या मिरवणुकीत आबालवृद्ध वाद्याच्या तालावर ठेका धरत सारी दुःख विसरून मातेचे विसर्जन करतांना भाविक दिसत आहेत.

कानबाई मातेचा लौकिक

खान्देशातलं सर्वात प्रसिद्ध ग्रामदैवत असा कानबाई मातेचा लौकिक, कौंटुबिक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. पंधरा दिवस आधीपासूनच उत्सवाच्या तयारीची सुरुवात होते. अत्यंत पवित्र वातावरणात सुहासिनी कानबाई मातेची स्थापना करतात. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला जातो, त्यावरची अशी आकर्षक रोषणाई साऱ्याचंच लक्ष वेधून घेते, कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचं रुप दिलं जातं. त्याला अलंकारानं मढवलं जातं, १०७ प्रकारच्या वनस्पती आणि ७ नद्यांचं पाणी आणून कानबाईची पूजा केली जाते अशी मान्यता आहे.

कानबाई मातेची अलंकाराने सजवून चौरंगावर विधिवत स्थापना केली जाते. काही भाविक परंपरेनुसार विधिवत दोन नारळाची कान्हाबाईची, कानबाई-रानबाई, कानबाई-कण्हेर, हातापायाची कानबाई अशा पध्दतीने स्थापना किंवा मांडणी करीत असतात. सायंकाळी कानबाई मातेची पुरणपोळी, सार-भात (रोट)चे नैवद्य समोर ठेवून पूजन आरती करतात. पूजेवेळी सर्व भाऊबंदकीचे लोक पूजेसाठी हजर असतात.

बाहेरगावी वास्तव्यास असलेली भाऊबंदकीही रोट खाण्याच्या निमित्ताने एकत्र येत असतात. या एकत्र येण्यामुळे भाऊबंदकीतील रुसवे-फुगवे निघून जातात व भेट होते. त्यानंतर रात्री कानबाईचे पाया पडण्यासाठी भाविक भक्त विशेष महिलावर्ग येत असतात. यावेळी फुगड्या व लाऊड स्पिकरवर नाचण्याचा आनंद घेत असतात,यावेळी रात्रभर जागरण होत असते. दुसऱ्या दिवशी सोमवारी वाजत गाजत डीजेच्या तालावर ठेका धरत कानबाईला डोक्यावर धरत मोठ्या उत्साहात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.कळमसरे येथे गावाबाहेर असलेल्या नवसाचा गणपती मंदिरावर तर पातोंडयात माहिजी देवी प्रांगणात गावातील सर्व कानबाई मातांची कानबाईच्या जयघोषात विसर्जन करण्यात आले.

 

Protected Content