भादलीकरांसाठी कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी : पालकमंत्री

जळगाव प्रतिनिधी । ग्रामीण भागातील जनतेला वॉटर, मीटर, गटर या पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यामुळे जनतेची जी मागणी असेल ती पूर्ण करणे हे आपले आद्य कर्तव्य असून ते पूर्ण करण्याला आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील भादली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. 

भादलीला परिसरातील सर्व महत्वाच्या गावांना जोडण्यासाठी तब्बल १६ कोटी रूपयांची तरतूद असणार्‍या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्र्यांना याप्रसंगी दिली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपुजन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आले. तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत इमारतीच्या निधीसाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या इमारतीचे भूमिपुजन करण्यात आले. यासोबत स्थानिक विकास निधी अंतर्गत दत्त मंदिर परिसरात पाच लाख रूपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सरपंच मिलींद चौधरी प्रास्ताविक करतांना म्हणाले की, ग्रामसचिवालय हे खूप महत्वाचे स्थान असते. आम्ही या वास्तूसाठी शब्द टाकताच त्यांनी गावकर्‍यांच्या प्रेमापोटी २५ लक्षांचे काम दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. 

जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील म्हणाले की, पालकमंत्र्यांकडे काम मागितल्यानंतर ते तात्काळ मंजूर होते याचा एकदा नव्हे तर मला शंभरदा अनुभव आला आहे. यामुळे भादली गटात अनेक कामे करता आली. तर भाऊंच्याच मदतीने नशिराबादला ६ कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी उभे राहत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे अजातशत्रू व्यक्तीमत्व असून त्यांच्याकडे कोणताही राजकीय भेद आपल्याला दिसून येत नाही. ते खर्‍या अर्थाने विकासाची मुलूखमैदान तोफ असल्याची स्तुतीसुमनेही त्यांनी उधळली. तर आसोद्याच्या उपसरपंच वर्षा भोळे यांनी देखील आपल्या मनोगताने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात कोणताही राजकीय भेद न बाळगता विकासकामांना मंजुरी देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. भादली ग्रामपंचायतीला शंभर वर्षे पूर्ण झाली असून याची इमारत जीर्ण झाली आहे. यामुळे ग्रामस्थांनी याबाबतची माहिती देताच ग्रामपंचायत कार्यालयासाठी पंचवीस लाभ रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर याच प्रमाणे पेव्हर ब्लॉकचे काम सुध्दा सुरू करण्यात आले असून गावकर्‍यांसाठी नवीन पाण्याची टाकी देखील लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

दरम्यान, भादली गावाच्या एकोप्याचे आपल्याला खूप कौतुक वाटत असून ही एकी भविष्यातही कायम रहायला हवी अशी अपेक्षा ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, आपण भादली येथील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेळगाव बंधार्‍यावर ४४ कोटी रूपयांचा पुल झाल्याने भादलीच्या विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादनही पालकमंत्र्यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे छगन खडसे , विभाग प्रमुख हिरालाल कोळी (आबा) व ग्रामपंचायत ती मार्फत करण्यात आले होते.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे , जि. प.  उपाध्यक्ष लालचंद पाटील , तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण,  पं. स.  सदस्या जागृती चौधरी , सरपंच मिलिंद चौधरी , श्याम कोगटा, छगन खडसे , विभाग प्रमुख हिरालाल कोळी (आबा), जितु नारखेडे,  निळू नारखेडे , आसोदा उपसरपंच वर्षाताई भोळे,  तुषार महाजन , शरद नारखेडे , अजय महाजन , गिरीश भोळे,  किशोर चौधरी , युवराज कोळी परिसरातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्राम्सथ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश माने यांनी केले तर आभार भुषण पाटील यांनी मानले.

 

 

Protected Content