विरोधकांना योग्यवेळी उत्तरे देऊ- मुख्यमंत्री

 

मुंबई : वृत्तसंस्था । मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ.जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

विरोधकांकडून मिठागराची जमीन आहे असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. आज त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी सर्वांना कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

“मुंबईच्या कारशेडचा विषय वेगळा आहे. सर्वांना एक सांगावसं वाटत आहे. जर्मनीच्या एका कंपनीकडून आपण ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे. आम्हाला महाराष्ट्र सोयीस्कर वाटतो असं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे राज्यातील जनतेच्या मेहनतीचं फळ आहे.” असंही त्यांनी सांगितलं. महिलांसाठी आपण लोकल सेवा सुरू केल्या आहेत. सर्वांसाठी लोकल सुरू करण्यावर केंद्राशी चर्चा सुरू आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हेदेखील उत्तम सहकार्य करत असल्याचंही त्यानी सांगितलं.

“देशात इतरत्र, मुख्यता दिल्लीत संख्या वाढतेय. याचं कारण दिल्लीत प्रदुषण वाढलंय. त्यानंतर तो विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर घातक परिणाम करतो. त्यानंतर याचा जास्त त्रास होतो. दिवाळी साजरी करताना खबरदारी घ्यावी. दिवाळीत प्रदुषण करणारे फटाके टाळू शकतो का हे पाहायला पाहिजे. मी कुटुंब प्रमुख या नात्यानं सर्वांना सांगतोय,” असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. “आपण आतापर्यंत जे साधलंय त्यावर चार दिवसांमुळे पाणी फेरलं जाऊ नये. सार्वजनिक ठिकाणी प्रदुषण करणं टाळावं,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

“परिस्थिती आटोक्यात असली असं वाटत असलं तरी दिवाळी आणि दिवाळीनंतरचे काही दिवसही महत्त्वाचे आहे. पाश्चिमात्य देशात पुन्हा संख्या वाढत आहे . आकडेवारी पाहिली तर मी म्हणेन ही लाट नाही त्सुनामी आहे. अत्यावश्यक सेवांमधील सर्वजण अत्यंत तणावाखाली आपल्यासाठी लढत आहेत. राज्यात पुन्हा लॉकडाउनची वेळ आली तर सर्वासाठीच त्रासदायक ठरेल. दुसरी लाट आली तर सर्वांची त्रेधातिरपीट उडू शकते. आपल्याला सुविधा वाढवता येऊ शकतील. पण डॉक्टर्स किंवा त्याविरोधात लढणाऱ्यांची संख्या आपल्याला वाढवता येणार नाहीत. त्यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

Protected Content