शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड — संजय राऊत

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  “होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या , हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

बुधवारी मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी तिथे आलेले शिवसेना कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यामध्ये आधी वाद आणि त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्य झालं. शिवसेना भवनासमोर हा राडा झाल्यानंतर त्यावर भाजपा आणि शिवसेनेमधून परस्परांवर आरोप करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेकडून गुंडगिरी सुरू असल्याची टीका झाल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

 

शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यानंतर मोठा राडा झाला. माहीम पोलीस  स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊतांना विचारणा केली असता त्यांनी विरोधकांना परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे. “होय शिवसेना गुंडगिरी करते. पण त्याला सत्तेचा माज म्हणणं चुकीचं आहे. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे”, असं राऊत म्हणाले आहेत.

 

संजय राऊत यांनी काल झालेल्या प्रकाराला पर्याय नसल्याचं सांगितलं आहे. “विरोधी पक्षांना आंदोलनाचा पूर्ण अधिकार आहे. पण आंदोलन करताना तुम्ही आमची जी श्रद्धास्थानं आहेत, त्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल, तर ते सहन होणार नाही. कालचा प्रकार दुर्दैवी जरी असला, तरी त्याशिवाय पर्याय नव्हता. शिवसेना भवनासमोर आंदोलन नाही करायचं. ते ठिकाण महाराष्ट्रात आणि देशात अपवाद आहे”, असं ते म्हणाले.

 

कालच्या गोंधळामध्ये महिला कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र, हा दावा संजय राऊतांनी फेटाळून लावला आहे. “कुठेही महिलेवर हल्ला झाला असं मला वाटत नाही. महिलांनी अशा वेळी थोडं लांब थांबायला हवं. पुरुषांच्या अंगावर जाणं बरोबर नाही. भाजपामधल्याही अनेकांना या गोष्टी आवडलेल्या नाहीत, की कुणीतरी शिवसेना भवनावर जाऊन आंदोलन करत होतं. आंदोलनं करण्यासाठी वेगळ्या जागा खूप आहेत. एखादी गोष्ट पटत नसेल, तर तुम्हाला आंदोलन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

 

Protected Content