केरळच्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलकांसाठी पाठवला अननसांचा ट्र्क

थिरुअनंतपूरम : वृत्तसंस्था । दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवतांना केरळ राज्यातून चक्क एक ट्रकभर अननस शेतकऱ्यांनी पाठवले आहेत.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील एका महिन्याहून अधिक काळापासून पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर सिंघू बॉर्डरजवळ आंदोलन करत आहेत.

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील अननस उत्पादक शेतकऱ्यांनी आपण या संघर्षात आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे दाखवण्यासाठी हा ट्रक पाठवल्याचे समजते. सध्या या केरळमधील शेतकऱ्यांवर त्यांनी केलेल्या या कामासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नाताळाच्या दिवशीच संध्याकाळी एर्नाकुलम जिल्ह्यातील वाझाकुल्लम येथील केरळ पायनॅपल असोसिएशनमधील शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी उत्तरेकडील राज्यांमधील आंदोलक शेतकऱ्यांसाठी एक ट्रकभर अननस पाठवले. वाझाकुल्लमला केरळमध्ये पॅनॅपल सिटी म्हणून ओळखलं जातं. येथील अननस हे भारतभरात पाठवले जातात.

अननस उत्पादक शेतकऱ्यांनी आम्ही हा ट्रक आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठवला आहे. दिल्लीच्या सीमांजवळ हे शेतकरी दिवस-रात्र आणि थंड वातावरणामध्ये आंदोलन करत असल्याने आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही हा ट्रक पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे हे शेतकरी सांगतात.

“या शेतकऱ्यांसाठी आपण काय करु शकतो असा आम्ही विचार करत असतानाच ट्रकभर अननस पाठवण्याची कल्पना समोर आली. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. दिल्लीच्या सीमांवर सुरु असणारं आंदोलन हे केवळ हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांसाठी नाहीय असं आमचं मत आहे. सर्व शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन सुरु आहे. हे सर्व आमच्या सर्वांच्या हितांच्या संरक्षणासाठी लढत आहेत. त्यामुळेच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही अननस भरलेला ट्रक पाठवण्याचा निर्णय घेतला,” असं केरळ पायनॅपल असोसिएशनचे अध्यक्ष जेम्स जॉर्ज यांनी स्पष्ट केलं.

 

या ट्रकमध्ये २० टन अननस पाठवण्यात आले आहेत. “आम्ही अजूनही अननस पाठवता आली असती. मात्र ती पिकण्याचा कालावधी वेगवेगळा असल्याने त्यातील बरीच अननस फेकून द्यावी लागली असती. त्यामुळे आम्ही एकाच शेतातून ही अननस गोळा केली आहेत. या शेतकऱ्याला आम्ही असोसिएशनच्या वतीने मालाचे सर्व पैसे देणार आहोत,” असंही जेम्स यांनी सांगितलं आहे. केरळचे कृषीमंत्री व्ही. एस. सुनिक कुमार यांनी या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला हे ही विशेष.

Protected Content