जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून पतीने मित्राच्या मदतीने पार्किंग केलेली मोपेड दुचाकी पेटवून दिल्याची घटना शनिवारी मध्यरात्री रामरहिम नगरात घडली होती. यातील दोघांना अटक करण्यात आली. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रूकसारबी शेख अय्युब (वय-२३) रा. रामरहिम डीमार्ट जवळ ह्या गेल्या दीड महिन्यापासून माहेरी आईकडे राहत आहे. पती अय्युब शेख ईसुफ (वय-३०) रा. सुप्रिम कॉलनी यांच्याशी कौटुंबिक वाद झाल्याने त्या आईकडे राहतात. आईकडे जाण्यायेण्यासाठी त्यांच्या ओळखीच्या मिना प्रणव शहा यांची मोपेड प्लेझर गाडी (एमएच१९ बीए ४२५२) वापरत होते. २१ जून रोजी रात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारा सर्वजण घरात झोपलेले असतांना रूकसारबी यांचे पती अय्युब शेख व त्याचे सहकारी सैय्यद सोएब सैय्यद इसा (वय-२४) रा. मासुमवाडी यांनी मोपेड गाडी पेटवून दिली. गाडी जळाल्याने धुर आल्याने त्यांना जाग आली. त्यावेळी बाहेर अय्युब शेख व शोएब उभे होते. आरडाओरड केल्यानंतर दोघे दुचाकीवरून फरार झाले. लावलेल्या आगीत २५ हजार किंमतीची गाडी आणि दोन हजार रूपये किंमतीचे कपडे जळून खाक झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपासाधिकारी पोउनि गणेश कोळी यांनी दोघांना अटक केली.