कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीतही सिव्हिल हॉस्पिटल मधील शिवभोजन गरजूंसाठी मोठा दिलासा !

जळगाव प्रतिनिधी । करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीतही  जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे सुरु असलेले शिवभोजन थाळी केंद्र गरजूसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

याबाबत सविस्तर असे की, शासनाने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात साई मल्टी सर्व्हिसिस या संस्थेला शिवभोजन थाळी केंद्र दिले आहे. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देखील या संस्थेच्या वतीने याठिकाणी येणाऱ्या गरजुंना शिवभोजन सेवा पुरविली जात असल्याने गरजूंना मोठा दिलासा मिळत आहे. तसेच पार्सल सुविधा देखील उपलब्ध असल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे. या निर्णयामुळे सध्याच्या परिस्थितीत गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सिव्हिल येथील शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून दिले आहे.तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेतले जात आहे. जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे,भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घेत आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठीच्या सर्व आवश्यक त्या सूचना ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.या शिवभोजन केंद्रावर काशिनाथ सोनार,  रुखसार सय्यद, रमेश मालचे, पांडू सोनवणे यांच्यासह इतर सहकारी शिवभोजन सेवा देण्यासाठी मेहनत घेत आहे.

Protected Content