जळगावात तीन दिवसीय महापौर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शहरातील ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनतर्फे ‘महापौर सांस्कृतिक महोत्सव’ येत्या 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती, महापौर जयश्री महाजन यांनी सोमवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कलावंत मोहन तायडे, सचिव तुषार वाघुळदे, प्रभाकर जाधव, संघपाल तायडे, दीपक नाटेकर, वर्षा चौधरी, पूजा सोनवणे, गायत्री नाटेकर, लक्ष्मी नाटेकर आदी उपस्थित होते.

‘जळगाव शहरात कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी कलाप्रेमींचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. जळगावकरांना असे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने बघता यावे, रसिकांची गरज पूर्ण व्हावी, त्यांना उत्तमोत्तम कार्यक्रमाची मेजवानी मिळावी हा हेतू समोर ठेवून ‘महापौर सांस्कृतिक महोत्सवा’च्या नियोजनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात जळगाव नगरीला सांस्कृतिक नगरी असेही म्हटले जाते. आपल्या जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंत कलाकार राज्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला एक वेगळा ठसा उमटवत असून आपल्या जळगाव जिल्ह्याचे नाव उंचावत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. असे उद्गार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

तीन दिवसीय ‘महापौर सांस्कृतिक महोत्सव’ रुपरेखा..
या सांस्कृतिक महोत्सवात पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवार, 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता रेल्वे स्टेशन रोड परिसरातील व. वा. वाचनालय येथील नवीन सभागृहात 12 वर्षांआतील मुला-मुलींचे सोलो डान्स, 13 वर्षांआतील मुला-मुलींचे सोलो डान्स तसेच खुल्या गटासाठी समूह नृत्य (ग्रुप डान्स) अशा स्पर्धा होतील. त्याच दिवशी व.वा. वाचनालय येथील नवीन सभागृहात सायंकाळी 6 वाजता ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट चित्रपटातील गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होईल. दुसर्‍या दिवशी म्हणजेच रविवार, 14 ऑगस्ट 2022 रोजी रेल्वे स्टेशन रोड पसिरातील व.वा. वाचनालय येथील सभागृहात सकाळी 10:30 वाजता खुल्या गटासाठी गीतगायन स्पर्धा (करावोके) तर दुपारी 2 ते 4 या वेळेत केवळ महिलांसाठी ‘द ग्रेट मॉम’ नृत्य स्पर्धा होईल. तसेच सायंकाळी 6 वाजता भारतरत्न गानकोकिळा स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. तिसर्‍या दिवशी म्हणजेच सोमवार, 15 ऑगस्ट 2022 रोजी अर्थात स्वातंत्र्य दिनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकूल येथे सकाळी 11 वाजता देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम होणार आहे.

अशा या भव्यदिव्य ‘महापौर सांस्कृतिक महोत्सवा’त जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील अनेक कलावंत सहभागी होणार आहेत. प्रवेशासाठी शहरातील नवीपेठ परिसरातील जोशी स्पोर्ट्स येथे तसेच 9860303888, 9405057141, 8669343415 किंवा 9423487653 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content