दिवस फिरतात, भाजपने हे लक्षात ठेवावे ! : उध्दव ठाकरेंचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”दिवस हे सदासर्वदा सारखे राहत नाहीत, दिवस फिरतात हे भाजप आणि नड्डा यांनी लक्षात ठेवावे !” अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

काल रात्री संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आज दुपारी उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आज नड्डा जे म्हणालेत हे पक्ष संपतील. म्हणजे प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची हिंदूंमध्ये फूट पाडायची, भाषिक भिंती उभ्या करायच्या. स्थानिक अस्मिता चिरडायची. मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि पुन्हा मराठी, अमराठी असं राजकारण करायचं. स्वत:च्या राजकारणाच्या तुंबड्या भरुन घ्यायच्या. आपले विरोधक कोणी असतील तर त्यांना संपवायचं. असं हे भाजपाचं कारस्थान अत्यंत निष्ठुरपणे जनतेसमोर आलेलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, प्रादेशिक पक्षाची एकजूट हा पुढचा टप्पा झाला. पण प्रादेशिक पक्ष संपवण्याचं भाजपाचं कारस्थान आहे. त्याची सुरुवात कोश्यारींच्या वक्तव्यातून झालेली आहे, असं म्हटलं. यावेळेस उद्धव यांनी आपण जाणीवपूर्वकपणे राज्यपाल हा उल्लेख टाळल्याचे स्पष्टपणे सांगितले.

Protected Content