जळगाव प्रतिनिधी । टायराच्या ट्युबमधून गावठी दारूची तस्करी करणाऱ्या दोन भामट्यांना दारू, मोटारसायकलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेश कॉलनी येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा येथून शहरात बेकायदेशीर गावठी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील पवन नंदलाल बाविस्कर (वय-२७) व हिंमत गोपाल कोळी (वय-२४) असून दोघे जण विनानंबरच्या दुचाकीवरून टायराच्या ट्यूबमध्ये बेकायदेशील दारू भरून पांढऱ्या पिशवीत ठेवलेले आहे. अशी माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना गुप्त माहिती मिळाली. एलसीबीचे पोहेकॉ जितेंद्र पाटील यांनी दोघांना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्या माहितीच्या आधारावर गणेश कॉलनी भागातील गुरूदत्त मंदिराजवळ महेश महाजन, महेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी सापळा रचला. यात बेकायदेशीर दारूची तस्करी करत असल्याचे समोर आले.
अन् दोघांना पकडले
सोमवारी दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी परिसरातून जात असताना पोलिसांनी दोघांना पकडले़ नंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांच्याजवळ असलेल्या प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये टायराचे दोन ट्युब आढळून आले. त्यातील एका ट्युबमध्ये ५० लिटर तर दुसऱ्या ट्युबमध्ये १० लिटर गावठी दारू पोलिसांना आढळून आली. दरम्यान, पोलिसांना गावठी दारूची वाहतूक करणारे पवन बाविस्कर व हिंमत कोळी या दोघांना अटक केली असून त्यांच्याजवळील सहा हजार रूपये किंमतीची दारू व दहा हजार रूपये किंमची दुचाकी असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.